India Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting Updates, 07 May: बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. पवार कुटुंबातील उमेदवार आमने-सामने आल्यामुळे ही निवडणूक देशपातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातच ही लढत होत असताना ऐन मतदानाच्या धामधुमीत सुप्रिया सुळे चक्क अजित पवारांच्या घरी गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं घरी काय घडलं? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
विरोधी उमेदवाराच्या घरी सुप्रिया सुळे!
अजित पवार यांच्या घरी, अर्थात बारामतीतील विरोधी उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या घरी सुप्रिया सुळेंनी सकाळी मतदानानंतर भेट दिली. पवार कुटुंबातील सर्वांनी बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर समोर आलेल्या या घडामोडीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये थेट लढत आहे. यात पवार कुटुंबातील बहुतेक सदस्य शरद पवारांच्या बाजूने असताना अजित पवार आज त्यांच्या आईसमवेत मतदानासाठी आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. हे अजित पवारांचं शरद पवारांनाच प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता सुप्रिया सुळेंच्या भेटीची बाब समोर आली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवारांच्या घरातून बाहेर पडताना सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांच्या घरी येण्याचं कारण विचारलं असता त्यांनी आशाकाकींना (अजित पवार यांच्या आई) भेटायला आल्याचं सांगितलं. “मी आशाकाकींना भेटायला आले होते. एका सशक्त लोकशाहीत मतदान हे जबाबदारीचं काम असतं. आशाकाकी अतिशय जबाबदारीने मतदानाला आल्या. मी फिरत फिरत इथे भेटायला आले. हे आमचं नेहमीचंच रुटीन आहे. थोड्या वेळापूर्वी सुमती काकीही मला भेटल्या. प्रतापकाका, आशाकाकी अशा आमच्या घरातल्या वरीष्ठांची आम्ही नेहमीच भेट घेत असतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामतीच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला कशाचीच भिती…
अजित पवारांशी भेट झाली?
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी भेट दिली तेव्हा अजित पवारही घरात उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. अजित पवारांचीही भेट घेतली का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता आपली इतर कुणाशीही भेट झाली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. हे आपल्या काकींचं घर असून तिथे आपण कधीही येऊ शकतो असं सांगतानाच काकींना भेटून मी लगेच निघाले, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. “जेवढं माझ्या आईनं माझं केलं नसेल, तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी केलं आहे”, असंही त्या म्हणाल्या.
निवडणूक काळात प्रचारादरम्यान पहिल्यांदाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे एकीकडे निवडणूक रिंगणात एकमेकांवर टीका करणारे पवार कुटुंबीय मतदानानंतर भेटीगाठी घेताना दिसत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.