लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ३० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आहेत. तर १७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा पराभव केला आहे. सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ हजार मतं मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांनी १.५९ लाख मतांनी विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाला. तर शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर विरोधात उभा राहिला आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली, तर अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिगणात उतरवलं होतं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष पाहायला मिळाला. या संघर्षात नणंदबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे.
जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले. त्यानंतर अजित पवार यांचा गट महायुतीत सहभागी झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीत अजित पवारांच्या गटाला केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या होत्या. यापैकी बारामती आणि शिरूर या मतदारसंघात या दोन गटांचे उमेदवार आमनेसामने होते. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आहे.
हे ही वाचा >> “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात”, लोकसभेच्या निकालानंतर रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “मारून मुटकून…”
बारामतीत आपल्या पत्नीचा विजय व्हावा यासाठी अजित पवार यांनी जंग जंग पछाडलं होतं. मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र शरद पवार यांनी संयमीपणे ही स्थिती हातळत कार्यकर्त्यांना एकवटलं. परिणामी या मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा विजय झाला. या विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार आणि कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह एक कॅप्शन दिलंय. त्यामध्ये म्हटलंय की “श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!”