लोकसभा निवडणूक सुरु झाली आहे. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी १३ जागांवर मतदान सुरु पार पडलं आहे. अजून तीन टप्पे बाकी आहेत. अशात महाराष्ट्रात चर्चेत आहे ती बारामती लोकसभा निवडणूक. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या आहेत. ही लढाई नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरीही याकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना म्हणूनच पाहिलं जातं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवणं हा अदृश्य शक्तीचा एक कलमी कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे.
अजित पवारांचं जुलै २०२३ मध्ये बंड
अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत जुलै २०२३ मध्ये महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगात जेव्हा पवार विरुद्ध पवार हा वाद गेला तेव्हा अजित पवारांकडे आमदारांचं जे संख्याबळ आहे त्या जोरावर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह दिलं. तर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. या सगळ्या घडामोडींनंतर आता लोकसभेला नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होते आहे. ही लढाई अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. अशात सुप्रिया सुळेंनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?
अजित पवारांनी तुम्ही बटण दाबून उमेदवार निवडून द्या मी तुम्हाला निधी देईन असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर या प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी भाजपावर आरोप केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आम्ही तर तक्रार केली नव्हती. अजित पवारांना क्लीन चिट मिळाली असेल तर मान्य केलं पाहिजे. अदृश्य शक्तीच हे राज्य चालवते असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. अदृश्य शक्तीच्या मर्जीप्रमाणेच सगळं चाललं आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणाले की शरद पवारांना आम्हाला संपवायचं आहे. हाच एककलमी कार्यक्रम घेऊन अदृश्य शक्ती काम करते आहे” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”
बारामतीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार बारामतीत जोरदार प्रचार करत आहेत. तसंच सुनेत्रा पवारांनना निवडून आणण्याचं आवाहनही करत आहेत. शरद पवार यांच्याकडून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशात आता सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपा किंवा अजित पवार उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.