बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आजवरच्या प्रथेप्रमाणे प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत बारामतीमध्ये सभा घेत असतात. त्याप्रमाणे आज बारामतीमध्ये शरद पवार गटाची सभा संपन्न झाली. या सभेला सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांची आई प्रतिभा पवार, आमदार रोहित पवार आणि इतर नेते उपस्थित होते. या सभेत बोलत असताना सुप्रिया सुळे काहीप्रसंगी भावूक तर काही प्रसंगी अतिशय आक्रमक होताना दिसल्या. कुणाचेही नाव न घेता त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. “मागच्या दहा महिन्यांपासून मी सहन करतेय. पण आता कधीतरी उद्रेक होईल”, असे सांगून त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला.
सुप्रिया सुळे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या, “मी पैशांसाठी सत्तेत आलेले नाही. कितीही पैसे कमवले तरी आपण काकडीची कोशिंबीर खातो. कुणीही सोन्याची कोशिंबीर खात नाही. आपण मोकळ्या हाती आलो आणि मोकळ्या हातांनीच परत जाणार आहोत. जगण्यासाठी आपल्याला नाती लागतात. नाती तोडायला ताकद लागत नाही. पण नाती जोडायला ताकद लागते. तुम्ही समोरून वार करत आहात. मलाही ‘आरे ला कारे’ करता येतं. पण आरे ला कारे न करता, गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. ही ताकद एका महिलेतच असते.”
“माझ्या आधी रोहितने भाषण केलं. त्याच्या आईबद्दल विरोधकांकडून उल्लेख झाला, त्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. माझीही तिच भावना आहे. कुणाच्याही आईबद्दल अपशब्द काढूच नयेत. बाकी सगळं खपवून घेऊ, पण आईबद्दल बोलाल तर खपवून घेणार नाही. पहिल्यांदा तुम्ही आईवर बोललात. पण जर आता यापुढे माझ्या किंवा रोहितच्या आईवर बोलाल, तर ‘करारा जवाब मिलेगा’. ही धमकी नाही, तर हे मी प्रेमाने सांगत आहे”, असा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सूचक इशारा दिला.
लेकीसाठी आई प्रचारात! प्रतिभा पवार व्यासपीठावर आल्या, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण
इतकंही करू नका की उद्रेक होईल
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “माझ्यावर अनेक वार होत आहेत, पण मी ते सहन करते. आमच्या घरावर तर रोज टीव्हीवर चर्चा सुरू असते. आज कुणी हे बोललं, कुणी ते बोललं. मी आता या चर्चेच्या खोलात जाणार नाही. कारण या सर्वांची उत्तरं माझ्याकडं आहेत, पण मी देणार नाही. कारण ती माझी संस्कृती नाही. कारण शांत राहायला जास्त ताकद लागते. मी मागच्या दहा महिन्यांपासून सहन करतेय. पण इतकंही करू नका की एकदिवस सहनशक्तीचा उद्रेक होईल.”
मी शारदाबाई पवार यांची नात
आम्ही बोलत नाही, याचा अर्थ आमच्यात ताकद नाही, असा गैरसमज कुणी करू नये. मनगटाच्या ताकदीबद्दल बोललं गेलं. तर मी स्पष्ट करते, माझ्या हातात ज्या बांगड्या आहेत, त्या शारदाबाई पवार यांच्या आहेत आणि मी त्यांची नात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.