राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट तयार झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने त्यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांवर वेगवगळे आरोप करत आहेत. तसेच अजित पवार सातत्याने वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी एक नवीन वक्तव्य केलं आहे, ज्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. अजित पवार म्हणाले, “शरद पवार हे आमचं दैवत आहे, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर त्यांनी पक्षातील नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला यापूर्वीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही.
एका बाजूला शरद पवारांवर त्यांचे विरोधक सातत्याने घराणेशाहीचे आरोप करत आहेत. शरद पवारांना त्यांच्या मुलीला म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं प्रमुखपद द्यायचं होतं म्हणून त्यांनी सातत्याने अजित पवारांना डावललं असा आरोप होत असतानाच अजित पवार यांचं हे वक्तव्यदेखील सुप्रिया सुळेंकडे रोख करणारं आहे, अशी चर्चा आहे. यावर आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) अजित पवारांचा स्वभाव माहिती आहे, आणि राहिला प्रश्न त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तर कोणाला काय मिळालं याचा हिशेब करा, विश्लेषण करा. माझी राजकीय कारकीर्द पाहा, दादाची (अजित पवार) राजकीय कारकीर्द पाहा. याचं विश्लेषण केल्यावर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले होते, “शरद पवार हे आमचं दैवत आहे. परंतु, प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे वय गेल्यावर त्यांनी पक्षातील नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर कदाचित त्यांनी मला संधी दिली असती. मात्र, मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही. दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. जिल्हा बँक कधी शरद पवारांकडे नव्हती. ती जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही, सोडत नाही. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हतं. १९९२ ते २०१७ या कालावधीत मी पिंपरी चिंचवड महापालिकादेखील ताब्यात ठेवली.
हे ही वाचा >> “माझ्याकडे आदित्यचे फोटो असल्याचं सांगत तुम्ही…”, प्रियांका चतुर्वेदींवर शिंदे गटाचा हल्लाबोल
दरम्यान, या सगळ्या कौटुंबिक घडामोडी चालू असताना यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उडी घेतली आहे. फडणवीस म्हणाले, “अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. मात्र, नंतर त्यांनाच पक्षातून बाहेर पडावं लागलं. कारण त्यांना लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. शरद पवार हे सुप्रिया सुळेंनाच पक्षाची जबाबदारी देतील.