मनले प्रमुख राज ठाकरे यांनी काल (१२ मे) ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. तसंच, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही प्रहार केले. एवढंच नव्हे तर त्यांचा जुना व्हीडिओ दाखवून लाव रे तो व्हीडिओची झलक दाखवून दिली. सुषमा अंधारेंनीही त्यांच्यावर झालेल्या टीकेवर आता प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, “शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.”

हेही वाचा >> राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली की शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली? २७ वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल?” असा प्रतिसवालही सुषमा अंधारे यांनी केला.

“पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा”, असंही त्या म्हणाल्या.

राज ठाकरे सुषमा अंधारेंबद्दल काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखविला. त्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता. या व्हिडीओच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. जर तुमचे वडिलांवर प्रेम असते तर बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन प्रवक्ते पद का दिले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andharens apt reply to raj thackeray said ramesh kini massacre kohinoor mill and sgk