लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीला ४५ जागा मिळतील असा दावा केला जात होता. मात्र, निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पदरात फक्त १७ जागा टाकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. काही दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत झाली होती. या तिरंगी लढतीत धैर्यशील माने यांचा १४ हजार ७२३ मतांनी विजय झाला.
हेही वाचा : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसेच्या नेत्याची टीका
राजू शेट्टींची भावनिक पोस्ट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. त्यांनी पराभव झाल्यानंतर आता फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना काही सवाल केले आहेत. राजू शेट्टींनी पोस्टमध्ये म्हटलं, “माझं काय चुकलं! प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही…”, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात कोणत्या दिग्गज नेत्यांचा पराभव
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांचा विजय झाला आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचाही बीडमधून पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे हे विजयी झाले आहेत. तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला आहे. मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल १८ सभा घेतल्या होत्या. मात्र, तरीही महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत.