Delhi Election Result Swati Maliwal Draupadi vastraharan Post : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबरोबरच राजधानी दिल्लीत जवळपास दशकभर सत्तेत असेलेल्या आपला पायउतार व्हावे लागणार आहे. यादरम्यान राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या परवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघात त्यांचा पराभव केला आहे. याबरोबरच भारतीय जनता पक्ष २६ वर्षांनंतर दिल्लीत सत्तेत आला आहे. या सर्व घडामोडीदरम्यान स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये महाभारतातील ‘द्रौपदी वस्त्रहरण’ प्रसंग दाखवण्यात आला आहे.
मालीवाल केजरीवाल यांच्यात दुरावा
मालिवाल या एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी होत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली होती. मालीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. मालीवाल यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाबद्दल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केली आहे.
मे २०२४ मध्ये मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय वैभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या, पण केजरीवाल घरात उपस्थित असताना त्यांना मारहाण करण्यात आली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान हा वाद आणखी चिघळला. मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर काँग्रेसचा बदला घेण्यासाठी हरियाणामध्ये प्रचार करून विरोधी इंडिया आघाडीशी विश्वासघात केल्याचा आरोप केला, ज्यामुळे इंडिया आघाडीची मते दुसरीकडे वळली.
दिल्ली निवडणुकीच्या काळात यमुना नदी स्वच्छ करण्यात सरकारच्या अपयशी ठरल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याबद्दल मालीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आपने जे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले होते त्या दिल्लीतील कचरा संकट, तुंबलेले गटारे आणि ढासाळलेल्या पायाभूत सुविधा यासारख्या समस्यांवरही त्यांनी वेळोवेळा भाष्य केले आहे.