Swati Maliwal Post : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर आज (८ फेब्रुवारी) सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आम आदमी पक्ष पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलानुसार दिल्ली निवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

“अहंकार रावण का भी नहीं बचा था…”

दरम्यान ‘आप’च्या या दारुण पराभवावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करतानाचे चित्र आहे. स्वाती मालीवाल यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर, “स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या अपमानाची आठवण करून दिली”, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचबरोबर मालीवाल यांनी “अहंकार रावण का भी नहीं बचा था…” अशीही पोस्ट केली आहे.

स्वाती मालीवाल यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. केजरीवाल यांचा अहंकार हरला आहे, हा पराभव केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुलीला ज्या पद्धतीने वागवले त्याचा परिणाम आहे, अशा आशयाच्या कमेंट्स येत आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

मालीवाल यांच्या या पोस्टवर एका युजरने म्हटले की, “भगवान श्रीकृष्णही एका महिलेचा अपमान पाहू शकले नाहीत. शेवटी, देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतोच. आता ‘आप’त्ती टळली आहे.”

दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, “भारतीय इतिहासात, ज्याने स्त्रीचा अपमान केला तो संपतोच. रावण आणि दुर्योधनाचे उदाहरण सर्वांसमोर आहे. आता यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे.”

मालीलाव-केजरीवाल वाद

काही महिन्यांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या सचिवाने गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या ड्रॉईंग रूममध्ये वाट पाहत असताना, केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली होती.

Story img Loader