सध्या तेलंगणा राज्यासह राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा एकूण राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. यातील राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात भाजपा आघाडीवर असून काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणात मात्र काँग्रेस आघाडीवर असून गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेला भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. याच कारणामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास काय होईल? काँग्रेसचे आमदार फुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते रविवारी (३ डिसेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
आमचा एकही आमदार फुटणार नाही- डी के शिकुमार
आमच्या पक्षातील एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. “आम्ही आमच्या उमेदवारांसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे. आमचे सर्व उमेदवार सुरक्षित असून भविष्यातही त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. ते आमचा एकही आमदार किंवा उमेदवार फोडू शकणार नाहीत. आम्हाला त्यांची राजकीय खेळी माहिती आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढलेलो आहोत. हे कोणत्याही एका नेत्याचे यश नाही,” असे डी के शिवकुमार म्हणाले.
काँग्रेस बीआरएसशी युती करणार नाही
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात युती होणार नाही, असेही स्पष्ट केले. “तेलंणातील जनतेने बदलचा निर्णय घेतला आहे, असे आम्हाला वाटते,” असे शिवकुमार म्हणाले.
१० वर्षांपासून बीआरएसची सत्ता
दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांत तेलंगणात काँग्रेसचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. येथे अद्याप मतमोजणी सुरू असून काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. बीआरएस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा पक्ष गेली १० वर्षे सत्तेत होता. तर बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे गेल्या १० वर्षांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.