Kamareddy assembly Seat : तेलंगणामध्ये काँग्रेसने भारत राष्ट्र समितीची १० वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. भाजपाने तेलंगणामध्ये विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसारख्या नेत्यांनी तेलंगणात प्रचार केला होता. मात्र, भाजपाला या ठिकाणी फारसे यश मिळाले नाही. तरीही कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठे यश मिळाले आहे. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच कथित भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे.
मुख्यमंत्री केसीआर यांचा पराभव
कामारेड्डी मतदारसंघात मतमोजणीच्या २० फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यात भाजपाच्या वेकंट रमना रेड्डी यांनी ६६,६५२ मते घेतली आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर मुख्यमंत्री केसीआर असून त्यांनी ५९,९११ मते घेतली आहेत. दोघांच्या मतांमध्ये ६७४१ मतांचे अंतर आहे. त्यामुळे रमना रेड्डी यांची आघाडी कायम असून त्यांना विजयी घोषित केले आहे. तत्पूर्वी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर त्यांचे अभिनंदन व्यक्त केले.
काँग्रेसचे रेवंत रेड्डी तिसऱ्या स्थानावर
विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. ते तिसऱ्या स्थानावर असून त्यांना ५४,९१६ मते मिळाली आहेत. रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला, हे स्पष्ट दिसत आहे. रेवंत रेड्डी कामारेड्डी आणि कोडंगल या दोन मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोडंगल या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी एकहाती विजय मिळविला आहे.
रेवंत रेड्डी यांच्याप्रमाणेच मुख्यंमत्री केसीआरदेखील गजवेल आणि कामारेड्डी या दोन मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यापैकी तेही परंपरागत गजवेल मतदारसंघातून विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, कामारेड्डीमध्ये त्यांना निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागत आहे.
कोण आहेत कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी?
भाजपाचे उमेदवार ५३ वर्षीय कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी हे व्यावसायिक आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ४९.७ कोटींची संपत्ती आहे. यापैकी २.२ कोटी जंगम आणि ४७.५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांनी जाहीर केलेले एकूण उत्पन्न ९.८ लाख असून त्यापैकी ४.९ लाख स्वतःचे उत्पन्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर ११ फौजदारी खटले दाखल आहेत.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघातून गंपा गोवर्धन यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (आता बीआरएस) कडून विजय मिळविला होता. त्यांना एकूण ४२ टक्के मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमाकांवर काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर होते. त्यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीचे अंतर केवळ दोन टक्के होते.
उत्तर तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात सदर विधानसभा मतदारसंघ मोडतो. या मतदारसंघात अनुसूचित जातीची लोकसंख्या तब्बल १४.७३ टक्के एवढी आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४.६ टक्के एवढी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचा साक्षरता दर केवळ ४८.४९ टक्के एवढा आहे.
२०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीत एकूण २,४५,८२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १,१८,७१८ पुरूष, तर १,२७,०९० महिला मतदार होत्या.