Telangana Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: तेलंगणामध्ये BRS अर्थात भारत राष्ट्र समिती सत्तेतून पायउतार होऊन काँग्रेसला बहुमत मिळेल, असा स्पष्ट अंदाज एग्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या या निष्कर्षांमुळे तेलंगणा काँग्रेस व काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, एकीकडे काँग्रेस तेलंगणामध्ये सरकार स्थापनेच्या तयारीला लागलेली असताना दुसरीकडे बीआरएसनं आपल्या विजयाचा दावा अद्याप सोडलेला नाही. त्यात एकीकडे मतमोजणीला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे बीआरएसचे खासदार के. केशव राव यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे पडद्यामागच्या हालचालींवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडतंय पडद्यामागे?

केशव राव यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भाजपा व एआयएमआयएम बीआरएसला गरज लागल्यास मदतीला येतील, असा मोठा दावा केला आहे. “काँग्रेस एकट्याने ही लढाई लढत आहे. त्यांच्याकडे कुणीही समर्थक नाहीत. त्यांना त्यांच्या एकट्याच्या बळावर बहुमतासाठीच्या जागा जिंकाव्या लागणार आहेत. पण बीआरएसला गरज लागली तर भाजपा व एआयएमआयएम आम्हाला मदत करतील”, असा दावा केशव राव यांनी केला आहे.

तेलंगणात कोण बाजी मारणार ?

“एग्झिट पोलमध्ये काहीही असो, सरकार आमचंच”

दरम्यान, एग्झिट पोलमध्ये बीआरएसचा पराभव होईल असा अंदाज वर्तवण्यात आला असताना केशव राव यांनी मात्र बीआरएस आरामात सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. “मी आत्ता आकड्यांवर बोलू इच्छित नाही. कारण एग्झिट पोल्समधून आलेल्या आकड्यांनाही महत्त्व आहे. तुमच्याकडे तुमचा सर्व्हे आणि त्याचे निष्कर्ष आहेत. माझ्याकडे माझा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष आहेत. एग्झिट पोलबाबत बोलायचं झालं तर त्यांनी काँग्रेसला तेलंगणामध्ये मोठी आघाडी सांगितली आहे. पण माझ्या अभ्यासानुसार आम्हाला तेलंगणामध्ये आरामात बहुमत मिळत आहे. त्यामुळे बीआरएस राज्यात सरकार स्थापन करेल”, असं ते म्हणाले.

काँग्रेसचं केलं अभिनंदन

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. “काँग्रेसला बहुमताचा अंदाज वर्तवला असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. हा काही विनोद नाही. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्ही खाली आलोय, ते वर जात आहेत. हे आम्हाला मान्य करायलाच हवं. कारण आकड्यांवरून ते दिसत आहे. हे सगळं लपवण्यात काहीच अर्थ नाही”, अशा शब्दांत त्यांनी बीआरएसच्या जागा कमी होत असल्याचं मान्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana brs mp claims bjp aimim support against congress in election result 2023 pmw