Telangana Assembly Election 2023 : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करीत आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना सामान्य शेतकरी आणि युवकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिसऱ्यांदा गजवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. मात्र, यावेळी त्यांच्याविरोधात मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांव्यतिरिक्त जवळपास १०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, बेरोजगार युवकांनी भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांना आव्हान दिले आहे. केसीआर गजवेल विधानसभेसह कामारेड्डी या विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवीत आहेत. तिथेही त्यांच्याविरोधात १०० हून अधिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ९ नोव्हेंबर ही शेवटची मुदत होती. गजवेल विधानसभा मतदारसंघात केसीआर यांच्यासह १०० हून अधिक अपक्षांनी अर्ज भरले. आता गजवेल विधानसभेतील एकूण उमेदवारांची संख्या १५४ एवढी झाली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये मुथ्यमपेट येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. निजामाबाद जिल्ह्यात लोकप्रिय असलेली निजाम डेक्कन शुगर्स हा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांव्यतिरिक्त गजवेल विधानसभेत बेरोजगार युवकांनीही अर्ज सादर केले आहेत. सरकारने नोकऱ्या पुरविण्यात आणि विशेषकरून सरकारी भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात कुचराई झाल्याचा आरोप युवकांनी केला आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे आणि अनियमितता झाल्यामुळे तेलंगणामध्ये काही काळापासून स्पर्धा परीक्षा झालेल्या नाहीत. वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी केलेल्या आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठीही काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.

केसीआर यांचा गजवेल विधानसभेतून दोनदा विजय

केसीआर यांनी २०१४ व २०१८ साली असा दोन वेळा गजवेल विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. २०१४ साली त्यांनी एकूण ४४.०६ टक्के मते मिळवून १९,३९१ एवढ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. २०१८ साली त्यांना एकूण १.२५ लाख मते (एकूण मतदानापैकी ६०.४५ टक्के) मिळाली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ५८ हजार मतांनी पराभव केला होता. २०१८ च्या निवडणुकीत त्यांनी बीआरएस पक्षाचा माजी नेता व भाजपाचा उमेदवार इटेला राजेंद्र यांचा पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार थुमकुंटा नरसा रेड्डी होते.

कामारेड्डीमधून पहिल्यांदाच लढत

कामारेड्डी मतदारसंघातून केसीआर पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. याही मतदारसंघात आतापर्यंत १०२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी बहुसंख्य उमेदवार कामारेड्डीमधील संयुक्त कृती समितीचे शेतकरी असून, त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. कामारेड्डी महापालिकेने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा विकास आराखडा कामारेड्डी महापालिका प्रशासन आणि नगरविकास विभागाने रद्द केला असला तरी शेतकऱ्यांची नाराजी दूर झालेली नाही.

तथापि, संयुक्त कृती समितीच्या शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यात भूमिका व्यक्त करताना सांगितले होते की, भविष्यात अशा विकास आराखड्यामुळे आमच्या जमिनी हिसकावल्या जाऊ नयेत यासाठी आम्ही विरोध म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहोत.

कामारेड्डी मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्याशी केसीआर यांची प्रमुख लढत आहे. रेवंथ रेड्डी हे कामारेड्डीशिवाय कोडांगल मतदारसंघातूनही निवडणूक लढवीत आहेत. मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असलेले रेवंथ रेड्डी हे तेलगू देसम पक्षाचे माजी नेते आहेत. भाजपाकडून या मतदारसंघात के. वेंकट रमण्णा रेड्डी निवडणूक लढवीत आहेत. २०१४ साली भारत राष्ट्र समितीच्या उमेदवाराने या ठिकाणी आरामात विजय मिळविला होता. मात्र, २०१८ साली काँग्रेसच्या मोहम्मद शब्बीर अली यांच्याकडून बीआरएसला कडवे आव्हान मिळाले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana cm kcr faces over 100 independents in gajwel and kamareddy assembly constituency kvg
Show comments