Telangana Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : विधानसभा २०२३ च्या निमित्ताने देशात अनेक अभूतपूर्व झाले. त्यापैकी एक बदल म्हणजे तेलंगणातील सत्ताधारी पक्ष नेस्तनाबूत होऊन काँग्रेसच्या हाती तेलंगणाचा कारभार आला आहे. यामुळे कर्नाटकनंतर तेलंगणा हे दाक्षिणात्य राज्य काँग्रेसच्या पारड्यात गेलं आहे. भाजपा, बीआरएस, काँग्रेस आणि एआयएमआय या चौघांमध्ये ही लढत झाली. परंतु, काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यास यश आलं आहे. केंद्रीय निवडणूक आय़ोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला ६६ जागा, बीआरएस ३९, भाजपा ८ आणि एआयएमआयएमला ७ जागा मिळाल्या आहेत.
स्वतंत्र तेलंगणासाठी चंद्रशेखर राव यांनी आंदोलन पुकारले होते. त्यांच्या आंदोलनाला यश येत आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे २०१४ साली स्वतंत्र राज्य झालं. तेव्हापासून चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. गेली दहा वर्षे राज्यातील सत्तेच्या गादीवर बसल्यानंतर यंदाही जनता त्यांच्याच पारड्यात सत्ता देईल, असा विश्वास होता. परंतु, काँग्रेस व भाजपने केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर राव हे उत्तर देण्यात कमी पडले. यातूनच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला.
गेल्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने तेलंगणातील राजकीय समीकरणे बदलत गेली. भाजपकडे जाणारा अन्य पक्षातील नेत्यांचा ओघ काँग्रेसकडे वळला. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसमध्ये पक्षाचे राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी समन्वय साधला. सर्व नेत्यांना एकत्र आणले. पक्षाअंतर्गत गटबाजी कमी झाली. भारत राष्ट्र समितीला पराभूत करू शकतो याचा काँग्रेस नेत्यांना अंदाज आल्यावर पक्षाने जोर लावला. त्याचा परिणाम झाला. लोकांमध्ये चंद्रशेखर राव यांच्या विरोधातील नाराजीचा काँग्रेसने फायदा उठविला.
हेही वाचा >> Madhya Pradesh Election Result 2023 : भाजपाचा एकहाती विजय; एग्झिट पोलच्या अंदाजापेक्षा मिळवल्या जास्त जागा!
चंद्रशेखर राव यांचा पराभव का झाला?
ज्यांच्या आंदोलनामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली त्यांना त्याच राज्यात पराभव स्वीकारावा लागला. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला होता, असं जाणकरांचं मत आहे. स्वत: चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री, त्यांचे पुत्र रामाराव हे मंत्री, भाचे हरीश राव मंत्री, मुलगी आमदार असा सारा घराण्याचा मामला झाला होता. सरकारने रयतु बंधू व दलित बंधू या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या. पण या योजनांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप झाले. दहा वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारच्या विरोधातील नाराजी वाढत गेली. काँग्रेस व भाजपने केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर राव हे उत्तर देण्यात कमी पडले. यातूनच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात.
एग्झिट पोलने काय म्हटलं होतं?
टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार्टनुसार भाजपा ५ ते १०, काँग्रेस ४९ ते ५९, बीआरएस ४८ ते ५८, एआयएमआयएम ६ ते ८ जागा
रिपब्लिक टीव्ही – भाजपा ४ ते ९, काँग्रेस ५८ ते ६८, बीआरएस ४६ ते ५६, एआयएमआयएम ५ ते ७ जागा
जन की बात – भाजपा ७ ते १३, काँग्रेस ४८ ते ६४, बीआरएस ४० ते ४५, एआयएमआयएम ४ ते ७ जागा
इंडिया टीव्ही सीएनएक्स – भाजपा २ ते ४, काँग्रेस ६३ ते ७९, बीआरएस ३१ ते ४७ आणि एआयएमआयएम ५ ते ७ जागा मिळवतील असा अंदाज होता.
प्रत्यक्षात काँग्रेस ६४, बीआरएस ३९, भाजपा ८ आणि एआयएमआयएमने ७ सीपीआय एक अशा जागा मिळाल्या आहेत. म्हणजे एग्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत.