Telangana Assembly results : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले असताना आज चा राज्यातील (३ डिसेंबर) निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. विशेष करून तेलंगणाचा निकाल सर्वात धक्कादायक मानला जातो. मागच्या दोन टर्मपासून तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. मात्र यावेळी काँग्रेसने या सत्तेला जोरदार धक्का दिला असून सुरुवातीच्या मतमोजणीमध्येच काँग्रेसने आघाडीचा आकडा पार केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, मात्र दोन्ही मतदारसंघात तेच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
तेलंगणा निवडणुकीतील आणखी एक चर्चेतला चेहरा म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उतरले आहेत. हैदराबादच्या ज्युबिली हिल्स या मतदारसंघातून ते निवडणूक लढवित आहेत. सकाळी आलेल्या आकडीवारीनुसार त्यांनी या मतदारसंघात आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
हे वाचा >> BRS व भाजपात पडद्यामागे हातमिळवणी? खासदाराच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
२०१८ च्या लोकसभा निवडणुकीत याठिकाणी भारत राष्ट्र समितीचे नेते (तेव्हा तेलंगणा राष्ट्र समिती) मंगती गोपीनाथ विजयी झाले होते. मंगती गोपीनाथ यांना ६८,९७९ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या विष्णुवर्धन रेड्डी यांना ५२,९७५ मते मिळाली होती. गोपीनाथ यांनी १६,००४ मतांनी विजय मिळविला होता.
तसेच भाजपाचे लंकाला रेड्डी देखील या मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. तसेच एमआयएमने याठिकाणी मोहम्मद फराजुद्दीन यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेस आणि एमआयएम यांच्यात ही मते मिळविण्यासाठी स्पर्धा दिसू शकते.
तेलंगणातील काही मोठ्या लढती
गजवेल (Gajwel constituency)
तेलंगणाच्या सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल विधानसभा मतदारसंघ बीआरएससाठी खूप महत्त्वाचा आहे. याठिकाणी मुख्यमंत्री केसीआर निवडणूक लढवत आहेत. भाजपाने याठीकाणी एटेला राजेंद्र यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने टीएन रेड्डी यांना तिकीट दिले आहे.
कामरेड्डी (Kamareddy constituency)
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल यासह कामरेड्डी या मतदारसंघातूनही निवडणूक लढवित आहेत. गजवेल मतदारसंघातून जिंकण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांनी यावेळी दोन मतदारसंघ निवडले. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी निवडणूक लढवित आहेत. केसीआर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असेलेल रेड्डी सध्या आघाडीवर आहेत.
आणखी वाचा >> Telangana Election Result : निकालाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा बीआरएसवर ६००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
गोशामहल (Goshamahal constituency)
भाजपाचे वादग्रस्त आणि काही काळ निलंबित केलेले नेते टी. राजा सिंह यांना हैदराबाद मधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. सध्या ते या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांना ९९९३ मते मिळाली असून बीआरएसचे नंद किशोर व्यास यांना ७०३२ मते मिळाली आहेत.
सिरिसिल्ला (Sircilla constituency)
सिरिसिल्ला विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री केसीआर यांचे सुपुत्र आणि तेलंगणाचे उद्योगमंत्री केटी रामाराव निवडणूक लढवत आहेत. केटी रामाराव ‘केटीआर’ या नावाने परिचित आहेत. सध्या ते आघाडीवर असून काँग्रेसच्या के.के. महेंद्र रेड्डी यांना पिछाडीवर ढकलले आहे. भाजपाच्या राणी रेड्डी तिसऱ्या क्रमाकांवर आहेत.
चंद्रायनगुट्टा (Chandrayangutta constituency)
चंद्रायनगुट्टा विधानसभा मतदारसंघ हा हैदराबादमधील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाकडून त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी या ठिकाणाहून निवडणूक लढवित आहेत. बीआरएसकडून एम. सीताराम रेड्डी, काँग्रेसतर्फे बोया नागेश आणि भाजपाकडून के. महेंद्र निवडणूक लढवित आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्याप मतमोजणीचे आकडे आलेले नाहीत.