Telangana Election 2023 Date : तेलंगणात येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातले स्थानिक पक्ष तसेच काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीनेही तेंलगणात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यात काँग्रेसने तेलंगणातील जनतेला अशी काही आश्वासनं दिली आहेत, ज्याची देशभर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत तेलंगणा काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा सादर केला.
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात अवघ्या ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) आणि मोफत वीज देऊ अशी घोषणा केली आहे. तसेच मुलींच्या लग्नात सोनं आणि रोख पैसे देण्याचं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान, यावेळी केलेल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणाला वेगळं राज्य बनवण्यासाठी काँग्रेसने आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या भूमिकांचा पुनरुच्चार केला.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही कर्नाटकातल्या जनतेला पाच मोठी आश्वासनं दिली आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या लोकांनी रामाच्या नावाने मतं मागितली, त्यांनी राज्यासाठी काहीच केलेलं नाही. काँग्रेस महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देत आहे. त्यामुळे महिला दररोज बसने प्रवास करू लागल्या आहेत. बसने मंदिरात जाऊ लागल्या आहेत.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
५०० रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर दिला जाईल
महिला बसने मोफत प्रवास करू शकतील.
२०० युनिटपर्यंतची वीज मोफत
इंदिरम्मा उपहार योजनेअंतर्गत हिंदूंना त्यांच्या मुलीच्या लग्नात १ लाख रुपये इतकी रक्कम आणि १० ग्रॅम (एक तोळा) सोनं दिलं जाणार. तर अल्पसंख्यांकांना त्यांच्या मुलींच्या लग्नाच्या वेळी १,६०,००० रुपये दिले जातील.
प्रत्येक उच्च शिक्षित तरुणीला मोफत स्कूटी दिली जाईल.
शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाईल. तसेच त्यांना २० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाईल.