वसंत मोरेंनी मनसेला रामराम केला आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यांनी पक्षाला रामराम करणं, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोला घातलेला दंडवत या सगळ्याची चर्चा रंगली होती. अशात अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी वसंत मोरेंना सलाम पण मत रवींद्र धंगेकरांनाच असं म्हटलं आहे. ही पोस्ट चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

बरेच दिवस यावर बोलायचे होते. बाकी काही का असेना वसंत मोरे या नेत्याची ही वृत्ती माझ्या मनाला भावली. आधी एक सांगतो पुण्यातून रविंद्र धंगेकरच निवडून यावेत ही माझी इच्छा आहे. मला वेगळं बोलायचंय आहे.

कुठलाही नेता पक्ष सोडतो आणि दुसर्‍या पक्षात जातो. हे त्याचं संवैधानिक स्वातंत्र्य असतं. मतभेद होतात. काही मजबुरी असते किंवा राजकीय स्वार्थही असतात… वेगळं व्हावं लागतं. पण हे करताना, पूर्वी आपण ज्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलाय. तिथल्या वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला वेळोवेळी उमेदवारी दिली… अनेक महत्त्वाची पदं दिली… आपल्याला मोठं केलं… नांव दिलं… पैसा दिला… समृद्धी दिली… त्या वरिष्ठांशी राजकीय नातं तोडलं तरी माणसात ‘कृतज्ञता’ नांवाची एक गोष्ट असते… ती टिकवली तरच त्या नेत्याचे चारित्र्य दिसते. त्याच्यावरचे संस्कार दिसतात. ‘माणूस’ म्हणून तो विश्वासार्ह ठरतो. राजकारणी म्हणून नीतीवान सिद्ध होतो.

हे पण वाचा- “वर्चस्ववादी भेकड…”, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्यामुळे किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले…

अनेक नेते टीका करताना वयाचाही मान ठेवत नाहीत

जे नेते पक्ष सोडल्या-सोडल्या वरिष्ठांची निंदानालस्ती सुरू करतात… दोषारोप सुरू करतात… पुर्वी आपण ज्या नेत्यांच्या पाया पडत होतो… आदराने झुकत होतो… त्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद शब्दांत हेटाळणी करतात… ते खरंतर स्वत:ची लायकी दाखवतात. टीका करताना वयाचाही मान ठेवत नाहीत. आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवत नाहीत. ‘माणूस’ म्हणूनही असे लोक नीच असतात. राजकारणी म्हणून अत्यंत चारित्र्यहीन, निर्लज्ज असतात. ते कुणाचेच नसतात. ना स्वत:च्या कार्यकर्त्यांचे-ना जनतेचे. हल्ली अशा बेईमानी पिलावळीचा उच्छाद सुरू आहे राजकारणात. म्हणून या दलदलीत वसंत मोरेंसारखा राजकारणी लक्ष वेधून घेतो. मनाला भावतो. पक्ष सोडताना राज ठाकरेजींच्या फोटोला साष्टांग नमस्कार करून पक्ष सोडला. नंतरही दोषारोप नाहीत. राज ठाकरेंनाही मी त्याबाबतीत मानतो. त्यांनीही कधी बाळासाहेबांची निंदा केली नाही. पवारसाहेबांना सोडून गेलेल्या सुशिलकुमार शिंदेंनीही कायम जाण ठेवली की मी जो आहे तो पवारसाहेबांनी मला राजकारणात आणलं म्हणून… किंवा विजयसिंह मोहिते पाटलांनी कधी पवारसाहेबांची पातळी सोडून नालस्ती केली नाही. याला म्हणतात राजकारणातला ‘माणूस’.

वसंतराव मोरे, तुम्ही तोच माणुसकीचा आदर्श जपलात. हे पहा, आमचा पाठिंबा कायम धंगेकरांना राहील. ते ही तुमच्यासारखेच ‘माणूसपण’ जपणारे आणि म्हणूनच सर्वसामान्यांची जाण असणारे उमदे नेते आहेत. पण पक्ष सोडताना तुम्ही केलेल्या या आदर्श कृतीबद्दल सलाम वसंतराव… मनापासून सलाम.

किरण माने.

अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने तिकिट दिलं आहे. त्यामुळे पुण्यात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray camp leader kiran mane praises pune loksabha vba candidate vasant more but said this thing scj