लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी फक्त काही दिवस उरल्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची कुलाबा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत अरविंद सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाचे नेते राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका करत रंग बदलणारा सरडा असा टोला सावंत यांनी लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद सावंत काय म्हणाले?

“एक भोंगा सारखा उमेदवारी मिळणार म्हणत होता. ते असे सांगत होते की, लोकसभेला उभा राहणार आहे. मग काय या गल्लीत दादागिरी, त्या गल्लीत दादागिरी करत होते. मात्र, ज्या दिवशी त्यांचं नाव लोकसभेच्या उमेदवारीमधून कट झालं त्या दिवशी संपूर्ण कुलाब्याने आनंद व्यक्त केला. काल परवा त्यांनी या ठिकाणी सभा घेतली. त्यांनी घेतलेल्या सभेमध्ये खुर्च्या रिकाम्याच होत्या. रिकाम्या खुर्च्यासमोरच त्यांनी भाषण केलं. आता मी त्यांना सांगतो की, येथे पाहायाला या, तुमच्या हातातून कुलाबा निसटला आहे”, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी नाव न घेता राहुल नार्वेकर यांच्यावर केला.

हेही वाचा : “…तोपर्यंत भाजपाबरोबर जाणार नाही”; महायुतीत जाण्याबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान!

सावंत पुढे म्हणाले, “ही अशी माणसं आहेत. आता ते आधी आमच्या शिवसेनेत होते. मी त्यांना रंग बदलणारा सरडा म्हणतो. येथे होते तेव्हा भगवा, नंतर राष्ट्रवादीकडे गेले. त्यानंतर तोही पक्ष सोडला आणि भाजपात गेले. या माणसानं कुलाब्यात काय काम केलं?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी यावेळी विचारला. हे सरकार संवेदनाहीन असून त्यांना कोणाबाबतही काळजी नाही. निवडणूक आयोगापासून काही स्वायत्त यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या गुलाम झाल्या असल्याचा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला. तसेच आदर्श घोटाळ्यावर व्हाईट पेपर जाहीर केल्याच्या दुसर्‍या दिवशी अशोक चव्हाण भाजपाच्या वॉशिंग मशीनचे लाभार्थी झाले, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड-शो होणार आहे. त्यांच्या या रोड शो ची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावरूच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना मोंदीवर टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्राने पंतप्रधान मोदी यांना आताच रस्त्यावर आणलं आहे. त्यामुळे ४ जूनला काय होतं ते पाहा. मोदी मुंबईत येणार आहेत. ते विमानाने मुंबईत येतील. तुम्ही प्रधानसेवक असाल तर रेल्वेने फिरा. सर्व सुविधा पंतप्रधानांच्या घ्यायच्या आणि प्रधानसेवक असल्याचं ढोंग आणायचं”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader arvind sawant criticizes to bjp leader rahul narwekar mumbai politics gkt