भाजपाची पाचवी यादी खळबळजनक असल्याचे विधान मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी केले. भाजपाने आतापर्यंत चार याद्या जाहीर करून १३६ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक संपन्न झाली. उर्वरित ९४ उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी सदर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. भोपाळ येथे बोलत असताना मिश्रा बुधवारी म्हणाले की, यापुढे येणारी प्रत्येक यादी खळबळजनक असेल. अनेक धमाके होणार आहेत. दिवाळीचाही सण येतोय, हा योगायोग आहे.
अकार्यक्षम विद्यमान आमदारांचा पत्ता कट
प्रदेश भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम यादीमध्ये अनेक अकार्यक्षम आमदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. ९४ मतदारसंघाची यादी बाकी असून त्यात भाजपाचे ६७ विद्यमान आमदार आहेत. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने यापैकी २५ ते ३० आमदारांचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेनुसार या आमदारांच्या विरोधात नाराजी असल्याचे समोर आले आहे. मतदार त्यांच्या कामावर फारसे प्रभावित झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे वाचा >> विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपचे ज्येष्ठ नेते रिंगणात; शिवराजसिंह चौहान अस्वस्थ?
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विद्यमान आमदारांपैकी निम्मे आमदार त्यांचा मतदारसंघ राखण्यात अपयशी ठरतील, असे पक्षाला वाटत आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला जाईल. सोमवारी (दि. ९ ऑक्टोबर) चौथी यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह स्वपक्षातच एकाकी
मुख्यमंत्री शिवराज चौहान हे एकाकी झुंज देत असल्याची भावना त्यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघातील लोकांमध्ये निर्माण झाली आहे. चौहान यांना पक्षात एकटे पाडल्यामुळे बुधनी मतदारसंघातील २.७ लाख मतदार याबद्दल नाखूश आहेत. चौहान ‘मामा’ या नावाने मतदारसंघात लोकप्रिय आहेत. आपल्या मामाला पक्षातील नेतृत्व बाजूला करत असल्याबद्दल मतदारांमध्ये खदखद आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वीच एका जाहीर सभेत मतदारांना भावनिक आवाहन केले होते. मी जर यावेळी मुख्यमंत्री नाही झालो, तर तुम्ही सर्व माझी खूप आठवण काढाल. मुख्यमंत्री चौहान हे गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या कठीण काळाचा सामना करत आहेत. चौहान यांना प्रक्रियेतून बाजूला सारल्यामुळे बुधनीमधील भाजपाचे पदाधिकारी, समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत.
भोपाळपासून ७० किमी अंतरावर नर्मदेच्या काठी बुधनी मतदारसंघ आहे. २००६ पासून चौहान पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मागच्या १७ वर्षांपासून हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून अनेक लाभ आणि सन्मान या मतदारसंघातील लोकांना प्राप्त झाल्यामुळे ते शिवराज सिंह चौहान यांच्यापाठी ठामपणे उभे राहतात.
मतदारांचा चौहान यांना पाठिंबा असला तरी भाजपाने मात्र यावेळी त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलेले नाही. या विरोधात बुधनीतील लोकांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचाही इशारा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बुधनीमधील मतदार आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यापैकी काही जणांशी संवादही साधला. त्यापैकी अजय मांझी या व्यक्तीने सांगितले, “मामा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जावेत, अन्यथा आम्ही आंदोलनासाठी बसू.”
चौहान यांचे नाव पहिल्या तीन यादीत समाविष्ट केलेले नव्हते, यामुळेच भाजपा त्यांना बाजूला सारत असल्याची कुजबूज सुरू झाली. २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा बुधनी येथे पोहोचली. यावेळी चौहान यांचे सुपुत्र कार्तिकेय हे तोमर यांच्या बाजूला उभे राहिलेले दिसले. पण, चौहान यांनी मात्र यात्रेला हजेरी लावली नाही.
हे वाचा >> मध्य प्रदेशात दोन दशकांचे वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची धडपड
चौहान यांचे मतदारांना भावनिक आवाहन
२६ सप्टेंबर रोजी दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये सात केंद्रीय नेत्यांचा समावेश केलेला आढळला. यामध्ये काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा समावेश होता. यावरूनच हे स्पष्ट झाले होते की, भाजपा यावेळी अँटी इन्कम्बन्सीला तोंड देण्यासाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी अनेक चेहऱ्यांना समोर आणत आहे.
चार दिवसांनंतर १ ऑक्टोबर रोजी बुधनी येथे झालेल्या एका जाहीर सभेत चौहान म्हणाले, “माझ्यासारखा भाऊ तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा मी निघून जाईन, तेव्हा तुम्ही माझी आठवण काढाल.” या जाहीर सभेच्या दोन दिवसांनंतर आणखी एका सभेत चौहान म्हणाले, मी यावेळी निवडणूक लढवू की नको? ‘मामा’ने यावेळी मुख्यमंत्री व्हावे की नाही? चौहान यांच्या भावनिक आवाहनानंतर प्रेक्षकांमधून ‘हो’ असे उत्तर आले आणि त्यानंतर “मामा, मामा… ” असा जयघोष सुरू झाला.
आणखी वाचा >> राजस्थानमध्ये भाजपाचा मध्य प्रदेश पॅटर्न! सात खासदार लढवणार आमदारकीची निवडणूक
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपासून केलेल्या विधानावरून त्यांनी पक्षाच्या राजकारणावर नापसंती व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. २०१८ च्या १५ महिन्यांचा अपवाद वगळता शिवराज सिंह चौहान यांनी २००५ ते २०२३ असे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम केला आहे. ज्येष्ठ असूनही बाजूला केल्याबद्दल चौहान फारसे खूश नसल्याचे दिसत आहे.