भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून रोजी अपघाती निधन झाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते दिल्लीत गेले होते. तिथेच त्यांचा अपघात झाला. राजकीय वर्तुळ आणि मुंडे कुटुंबासाठी ही धक्कादायक घटना होती. ३ जूनला निधन झाल्यानंतर ४ जून रोजी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. आणि बरोबर आता १० वर्षांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यांची कन्या पंकजा मुंडेही या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे हा योगायोग फार महत्त्वाचा मानला जातोय. याबाबत पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या भावना स्पष्ट केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बाबांची पुण्यतिथी आणि निकाल एकत्र आहे, याकडे मी वेगळ्या भावनेने पाहते. मी सकारात्मकतेने पाहते. मला वाटतं बाबांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा >> मतदारसंघाचा आढावा : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ?

“मी पूर्णपणे सकारात्मकेतेनेच पाहतेय. मी योगायोगाने याकडे पाहते. आणि याचा विचार करतेय की ४ जूनच का? त्याचं उत्तर चांगलंच असावं असं मला वाटतं. लोकांना आनंद मिळण्यासाठी माझं राजकीय जीवन आहे. माझ्या स्वतःसाठी त्यात काही नाही. किर्तीरुपी उरावं यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही”, अशाही भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

“लोक याबाबत अत्यंत गंभीरपणे बोलत होते. पण मी बोलून त्यांना हलकं केलं. एखादा व्यक्ती सत्कारासाठी येतो, पण तो जिवंत राहत नाही. त्याचदिवशी आता निकाल लागणार आहे आणि मी लोकसभेत चाललेय. मी लोकसभेत जात नव्हते तेव्हा या घटना घडल्या नाहीत”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> पंकजा मुंडे यांना ‘माधव’चे बळ

बीडमध्ये प्रतिष्ठेची लढाई

दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व असणाऱ्या काळापासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्याविरोधात उभे ठाकणारा मराठा समाजही आता ताकदीने उतरला आहे. दुसरीकडे ओबीसी मतदारांमध्येही अस्वस्थता आहे ती नेतृत्वाला आव्हान असण्याची. गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असताना पंकजा मुंडे यांना सत्तेतील कोणतेही पद देण्यात आले नव्हते. आता जर नेतृत्व उभे करायचे असेल तर ही निवडणूक ‘ प्रतिष्ठे’ची करण्याशिवाय पर्याय नसल्याचीही भावना ‘ओबीसी’ मध्ये दाटलेली आहे. आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटावर कोण सरस ठरणार याची उत्तरे निकालानंतरच मिळतील पण राष्ट्रीय मुद्दे प्रभावहीन ठरतील, असेच चि़त्र बीडच्या प्रचारात दिसून येत आहेत.

बीड लाेकसभा मतदारसंघात ५५ उमेदवारांचे ९९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. यातील आठ उमदेवारांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत. २७ जणांचे अर्ज नाकारण्यात आले आणि १७ जणांनी अर्ज मागे घेतले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The result of the lok sabha will be announced on the death anniversary of gopinath munde pankaja munde said sgk