अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार आणि इतर नेत्यांपेक्षाही अधिक आक्रमकपणे छगन भुजबळ भूमिका मांडत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रती समाजात सहानुभूती दिसून येत आहे.” निवडणुकीचे दोन टप्पे झाल्यानंर छगन भुजबळ यांनी केलेलं विधान महायुतीला आश्चर्यकारक वाटण्याची शक्यता नाही. एवढंच नाही तर बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार लढतीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जाहीर सभांना ज्याप्रकारे गर्दी होत आहे. त्यावरून त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचे दिसून येते.” उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाजूने विधान केल्यानंतर पुढच्याच वाक्यात छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. मतदार यावेळीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा एक मजबूत सरकार निवडून आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बारामतीची लढत दुर्दैवी
दरम्यान या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांना बारामतीमध्ये नणंद-भावजय यांच्यात होत असलेल्या लढतीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, माझ्यासाठी तरी हा प्रकार दुःखद होता. एका कुटुंबात वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर हा जो काही प्रकार होत आहे. तो अनेक लोकांना पटलेला नाही. चूक कुणाची हा भाग वेगळा. पण हे घडलंच नसतं तर चांगलं झालं असतं, असं मला वाटतं.
नाशिकबाबत व्यक्त केली नाराजी
नाशिकमधून माघार घ्यावी लागल्याबाबतही भुजबळ यांनी भाष्य केले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माझे नाव नाशिकसाठी सुचविले होते. त्याप्रमाणे मी मनाची तयारी केली होती. पण इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र होत नव्हता. त्यामुळे मी अखेर माघार घेतली. कारण मी तिकीट मिळावे म्हणून रडत बसणारा नाही. मी महानगरपालिकेसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहिल्यांदा तिकीट मागितले होते. त्यानंतर माझ्यावर कधीही निवडणुकीचे तिकीट मागण्याची वेळ आली नव्हती. त्यानंतर मी दुसऱ्यांना तिकीट देत होतो. त्यामुळे या पातळीवर येणं, मला पसंत नव्हतं, म्हणून मी माघार घेतली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.