Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हेडिंग वाचून आश्चर्यमिश्रित धक्का बसला ना! साहजिक आहे. पण हे खरं आहे. राज्यभरात गेला महिनाभर प्रचाराचा धुरळा उडला. सोमवारी संध्याकाळी प्रचाराची मुदत संपली. उद्या मतदान होईल. या मतदानाच्या निमित्ताने असंख्य अनोख्या गोष्टी समोर आल्या आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा, आपलं म्हणणं मांडण्याचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. या हक्काला स्मरुन यंदाच्या निवडणुकीत तब्बल १५९ पक्ष रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे पक्ष प्रामुख्याने चर्चेत आहेत. यांच्याबरोबरीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी पक्ष हेही चर्चेत असतात. पण यांच्या बरोबरीने तब्बल १५९ पक्षांचे उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
टिपू सुलतान हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व. ‘टिपू सुलतान पार्टी’ या पक्षाचे २ उमेदवार उद्या होणाऱ्या निवडणुकीत रिंगणात आहेत. ‘विदुथलाई चिरुथाइगल कटची’ पक्षाचे ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे माजी गृहमंत्री आणि स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणारे नेते. संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते. मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीत ‘सरदार वल्लभभाई पटेल पार्टी’ या पक्षाचे ८ जण निवडणुकीत सहभागी होत आहेत. इन्सानियत पार्टीचे २ जण निवडणूक लढवत आहेत. ‘उत्तर भारतीय विकास सेना’ या नावाच्या पक्षाचे २ जण शर्यतीत आहेत. ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’चे ७ तर ‘पीस पार्टी’चे ७ उमेदवार रीतसर रिंगणात आहेत. ‘राईट टू रिकॉल पार्टी’ या नावाच्या पक्षाचे १८ उमेदवार रिंगणात आहेत. डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टीच्या एकमेव उमेदवाराचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल.
‘ब्ल्यू इंडिया पार्टी’चे ३ तर ‘चेंजमेकर्स पार्टी’चा एक उमेदवार रिंगणात आहे. संभाजी ब्रिगेड पार्टीचे १९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मोठ्या पक्षांच्या तुलनेत या छोट्या पक्षांचा परीघ मर्यादित असला तरी यानिमित्ताने लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा, लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचा अधिकार हे प्रकर्षाने सिद्ध होतं. उद्या या उमेदवारांचा फैसला मतपेटीत बंद होईल पण तुमची इच्छा आणि तयारी असेल तर तुम्ही निवडणूक लढवू शकता हे या यादीतून स्पष्ट होतं. जिंकणं-हरणं हा प्रक्रियेचा भाग झाला पण ठराविक विचार घेऊन लोकांसमोर मांडणं हा स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. १५९ पक्षांची यादी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जितंजागतं प्रतीक म्हणता येईल.
‘बहुजन समाज पार्टी’ अर्थात ‘बसपा’चे २३७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काशीराम आणि मायावती यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पक्षाचे दोनशेहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. ‘रिपब्लिक’ किंवा ‘रिपब्लिकन’ असं नावात असणारे १० पक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (२२), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ३१, रिपब्लिकन सेना (२१), ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी (१), आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी (२), रिपब्लिकन बहुजन सेना (२), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) ६, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (२), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे (२), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिफॉर्म्सिट (१) असे एकूण ९० उमेदवार आहेत.
पक्षाच्या नावात सेना शब्द असणारे १८ पक्ष निवडणूक लढवत आहेत. बहुजन शब्द नावात असलेले १० पक्ष आहेत. ११० पक्षांच्या नावात पार्टी हा शब्द आहे. काँग्रेस हा शब्द ८ पक्षांच्या नावात आहे. नॅशनल शब्द सहा पक्षांच्या नावात आहे. भारत आणि भारतीय हा शब्द २० पक्षांच्या नावात आहे. ५२ पक्षांचा एकच उमेदवार निवडणूक लढवत आहे.