लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजपाने अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आणि संविधान बदलाची चर्चा सुरू झाली. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपाने ४०० पार नारा मागे टाकला. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ४०० पार जागा मिळाल्यानंतर काय होणार? याबाबत भाष्य केले आहे. दिल्लीमधील एका प्रचार सभेत बोलत असताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ४०० पार जागा मिळाल्यानंतर भाजपा मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर आणि वाराणसीत ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी करणार आहे.
काँग्रेस आणि विरोधकांकडून भाजपाच्या नाऱ्यावर टीका झाली. भाजपाला ४०० जागा कशासाठी हव्या आहेत? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर स्पष्टीकरण देताना हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, सचिन तेंडुलकरला जर विचारले की, तू शतक, द्वीशतक, त्रिशकत का झळकावतो, तर अशा प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. त्याचप्रकारे काँग्रेसकडून विचारले जाते की, तुम्हाला ४०० जागा कशाला हव्या आहेत? तर त्याचेही उत्तर असेच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ३.०२ कोटींची संपत्ती; पैसे कुठे गुंतवले? वार्षिक उत्पन्न किती?
“भाजपाला ३०० जागा मिळाल्यानंतर अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर उभारण्यात आले. आता ४०० जागा जिंकल्यानंतर मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि बाबा विश्वनाथ मंदिर बांधले जाईल”, असे सरमा म्हणाले. तसेच काँग्रेसची सत्ता असताना एकदाही संसदेत पाकव्याप्त काश्मीरची चर्चा झाली नाही, अशी आठवण करून देत सरमा यांनी काँग्रेसवर टीका केली.
“मागच्या सात दिवसांत पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय चित्र दिसत आहे. तिथे रोज आंदोलने होत आहेत. पाकिस्तानच्या विरोधात लोकांमध्ये रोष असून भारतीय ध्वज हातात घेऊन निदर्षने होत आहेत. मी जेव्हा या परिस्थितीकडे पाहतो, तेव्हा मला ही फक्त सुरुवात असल्याचे दिसते. जेव्हा पंतप्रधान मोदींना ४०० हून अधिक जागा मिळतील तेव्हा पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असेल”, असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.