आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली. त्याआधी आयोजित विजय संलल्प सभेत घटकपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी येथे कसा काय आलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज आमच्याकडे आणि तुम्हा मतदारांकडे आहे’, असं सांगत मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावत आम्ही एकमेकांशी भांडत असल्याचा अनेकांना आनंद होत होता. आमच्यात मतभेद नक्की होते, पण भेट झाल्यानंतर सगळं मिटलं. सर्व वाद आम्ही संपवले आहेत असं सांगितलं.

आमची विचारधारा एकच आहे. हिंदुत्त्व आपला श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचं कसं ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘असं म्हणतात हात मिळाले, पण मने मिळाली नाही तर काय फायदा…आमची मने जुळली आहेत. गेल्या पाच वर्षात जे काही झालं ते झालं असा विचार आम्ही केला. गेल्या २५ वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही अस्पृश्य होतो’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांकडे अशी कोणती गोष्ट आहे.त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी एकही चेहरा नाही असा टोला लगावला. उद्धव ठाकरे बोलत असताना नरेंद्र मोदींच्या नावे होणाऱ्या घोषणा ऐकून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आव्हान देत विरोधकांनी एक सभा घ्यावी आणि एका नेत्याच्या नावे घोषणा करुन दाखवावी असं सागंतिलं. आधीच पाय खेचण्याचे कार्यक्रम सुरु आहे मग पुढची वाटचाल कशी सुरु राहणार असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मी मनापासून येथे आलो आहे असं सांगताना अमित शाह यांचा विजय आपली जबाबदारी आहे असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. सगळीकडे फक्त आपण आहोत, कोणतंही आव्हान नाही. तुम्ही पुढे चालत राहा, आम्ही सोबत आहोत अशी हमी उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attends rally organised for amit shah before nomination