राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांकडून एकेमकांवर टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्य फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी आज जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ बुलढाण्यात प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“२०१४ च्या लोकसभेच्या भाजपाला सर्वाधिक खासदार विदर्भाने दिले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्यारोबर होतो. भाजपाला सर्वाधिक आमदारही याच विदर्भानेच दिले होते. पण इतकं सगळं दिल्यानंतरही विदर्भातल्या किती लोकांना यांनी नोकऱ्या दिल्या? एकाने तरी हात वर करून सांगावं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. एकातरी शेतकऱ्यांनी मला हात वर करून सांगावं की त्यांचे उत्पन्न दुप्पट झालं? एकाजरी शेतकऱ्याचे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगितलं तर मी आता या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”

“भाजपावाल्यांची आणि मोदींची आम्हाला कमाल वाटते आहे की ते चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर चालून येतात. भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम त्यांनी निर्माण केला वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे त्यांचे तंगडं धरुन त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून नाही दिलं तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही”. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

“बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोक आणावे लागत आहेत. यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरून गेले. एक नारा देऊन गेले की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असं करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच “माझ्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. योगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करु नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray challenge narendra modi over farmers income spb