महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. उद्या सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी आज पाटणमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदींचं आव्हान स्वीकारत त्यांनाही प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रातील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यांनी राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखावावं असे ते म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, “कालपरवा पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. त्यांनी मला आव्हान दिलं की मी राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेंबाबाबत दोन शब्द चांगले बोलून दाखवावं. काल प्रियांका गांधी शिर्डीत आल्या होत्या, तेव्हा त्या बाळासाहेबांबाबत भरभरून बोलल्या. त्यांनीच भाजपाचे दात घशात घातले. खरं तर तोडा फोडा आणि राज्य करा हीच भाजपाची निती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गटावरही सोडलं टीकास्र
“आपलं सरकार गद्दारी करून पाडण्यात आलं. कारण तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि मी तो लुटू देत नव्हतो. म्हणून त्यांनी पहिला घाव शिवसेनेवर घातला. मिंधेंना कळत नाही. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची निती आहे. निवडणुकीच्या प्रचारात अमित शाह बोलले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. याचा अर्थ मिंधे गटाचा उपयोग संपला”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – “…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
शंभूराज देसाईंनाही केलं लक्ष्य
“पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो”, असा इशारा त्यांनी शंभूराज देसाई यांना दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, “याच गद्दाराने पाटणमध्ये उद्योग का आणले नाही? हे त्याला विचारा. या लोकांना मी सर्व दिले. तरीही यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला. गद्दारी करुन ते सुरतला गेले. तिकडून गुवाहाटीला गेले.”