मिंधे गटाने महाराष्ट्राची विल्हेवाट लावली आहे. आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी अशी झाली आहे. एका सर्वेनुसार आपलं राज्य अधोगतीकडे जात आहे. कारण महाराष्ट्र लुटला जातो आहे. मराठी अस्मिता पायदळी तुडवली जाते आहे. हे राज्य दरोडेखोर आणि गुंडांच्या हाती आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावरून माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही लक्ष केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज जळगावच्या चोपडा येथे उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर सडकून टीका केली. “गद्दारी फक्त शिवसेनेशीच नाही झाली, तर ती जनतेशीदेखील झाली आहे. आज अनेक जण आपल्याला पाठिंबा देत आहेत, हे बघून मिंधेंचीही बोबडी वळली असेल. मुळात नालायकपणा किती करावा याला मर्यादा असतात. एक संघटना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली. जर ही स्थापन केली नसती केली, तर मुंबईत मराठी माणूस दिसला नसता, मिंधे गट कुठं आहे, हेसुद्धा कुणाला कळलं नसतं”, असे ते म्हणाले.

“या लोकांनी महाराष्ट्राची विल्हेवाट लावली आहे. आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी अशी झाली आहे. एका सर्वेनुसार आपलं राज्य अधोगतीकडे जात आहे. कारण महाराष्ट्र लुटला जातो आहे. मराठी अस्मिता पायदळी तुडवली जाते आहे. हे राज्य दरोडेखोर आणि गुंडांच्या हाती आहे”, असा घणाघातही त्यांनी केली.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनाही केलं लक्ष

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावरून माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनाही लक्ष केलं. “मिंधे गट आज राज्यभर फिरत आहेत, ही हे सगळे चोर आहेत. त्यांनी आपली शिवसेना चोरली, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, आणि आज मोठा आव आणून सांगतात की ही शिवसेना आमची आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात गेलो होते. आज अडीच वर्ष झाली. न्यायालयाचे दार ठोकून ठोकून आता फक्त डोक आपटायचं बाकी राहिलं आहे. डी.वाय. चंद्रचूड हे तिसरे सरन्यायाधीश निवृत्त झाले. ते उत्तम प्रवचनकार होऊ शकतात. त्यांनी प्रवचन चांगले दिलं. पण डोळ्यादेखत लोकशाहीचा मुदडा पडला हे दिसत असताना, ते लोकशाही वाचू शकले नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

“पूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती, ती त्यांनी काढली आहे. पण त्यांच्या डोळ्यादेखत घटनाबाह्य सरकार असताना तरीही त्यांनी अडीचवर्ष तसंच सुरु ठेवलं. हा गुन्हा नाही का? आज आम्ही शिवसेनेसाठी न्याय मागतो आहे. जी लोकशाही पायदळी तुडवली जाते आहे. त्याकडे बघायला तयारी नाही. आम्हाला न्याय हवा आहे. निकाल आमच्या बाजुने द्या असं आम्ही म्हणत नाही. पण जे काही घडलं ते आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहे. ते सुद्धा तुम्ही कायद्याच्या चौकटीतून योग्य की अयोग्य हे सांगू शकत नसाल, तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? त्यामुळेच आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticized eknath shinde faction dy chandrachud over party symbol issue spb