पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुखासाठी आम्ही दहा वर्षे झटलो आणि आमच्या पदरात धोंडे पडले असं म्हणत हिंगणघाटच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीची संयुक्त सभा हिंगणघाटमध्ये पार पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदी आणि भाजपाचा ठाकरी शैलीत समाचार घेतला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“गद्दारांना ५० खोके मिळाले, मी गेलो असतो तर मला किती खोके मिळाले असते? पण मला खोके नकोत. माझी जनता माझं ऐश्वर्य आहे. त्यावर मोदी जीएसटी लावू शकत नाहीत. आजपर्यंत अत्यंत वाईट पद्धतीने राजकारण केलं आहे. आजपर्यंत तुम्ही जे करताय तसं कधीही कुणी केलं नाही. तुम्ही ज्या गोष्टीला हिंदुत्व म्हणत आहात ते तुम्ही संपूर्ण जगात बदनाम केलं आहे. ज्या पद्धतीने नेत्यांना तुरुंगात टाकलं जातं आहे जगात देशाची बदनामी झाली. ही जुलूमशाही सुरु आहे. घटना बदलणार मग आम्ही नाकर्त्यासारखे बघत बसणार? ” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आत्ताही जागा मित्र पक्षालाच दिली आहे
“मी वर्धा लोकसभा मतदारसंघात आलो नव्हतो कारण ही जागा मित्रपक्षाला दिली होती. आत्ताही जागा मित्र पक्षालाच दिली आहे, त्याच मित्रपक्षाला विजयी करण्यासाठी मी वर्ध्यात आलो आहे. मी कायमच सांगतो की आम्हाला हे वाटत होतं की देश मजबूत करायचा असेल तर देशात एका व्यक्तीचं सरकार पाहिजे. कारण संमिश्र सरकार उत्तम चालतात. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी उत्तम सरकार चालवलं आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
गद्दारांना शिवसेनेचं चिन्ह आणि नाव दिलं
“शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मोदी आणि अमित शाह यांनी गद्दारांना दिलं आहे. मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे. याच वर्ध्यात नरेंद्र मोदी म्हणाले होते की उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे. तुम्ही इथे जमलेले किती शिवसैनिक आहात? या शिवसैनिकांचे हातच तुम्हाला दिल्लीच्या तख्तावरुन खाली खेचतील. निवडणूक आयोगाचा गैरवापर केला जातो आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा एकही विचार सोडलेला नाही. महाराष्ट्राच्या आड कुणी आलं तर आडवं करणारच.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा ही मोदींची अवस्था
“हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना संपवायला निघालात, माझ्या मशाल गीतातला जय भवानी आणि जय शिवाजी यातल्या भवानी मातेबद्दल इतका आकस का? महाराष्ट्र द्वेष्टं सरकार आपल्याला सत्तेवरुन खेचावंच लागेल. हे रामाचं नाव घेत आहेत कारण गावी चालले आहेत, आमचा रामराम घ्यावा असं त्यांचं चाललं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर मी जातो तेव्हा मला शेतकरी सांगतात आमच्या घरात खायला दाणाही नाही. मोदींची आत्ताची अवस्था म्हणजे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा अशी आहे.” अशीही बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.