देशात काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना दिली जातील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“देशाचे पंतप्रधान विकास, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर काहीच बोलत नाहीत. ते कशावर बोलतात? तर मांस कोण खातं आहे? मच्छी कोण खातं आहे? कोणाला किती मुलं होणार? या विषयांवर ते बोलतात.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपाचे नेते म्हणतात गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोदींचा फोटो लावून निवडून आले. या निवडणुकीत गद्दार सेनेच्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी मोदींचा फोटो का वापरला जात नाही? कारण मोदींचं नाव महाराष्ट्रात चालत नाही. त्यांचं नाणं महाराष्ट्रात चालेनासं झालं आहे. अमित शाह यांचा तर महाराष्ट्राशी काडीचा संबंध नाही. अमित शाह इकडे येऊन फणा काढतात, मणिपूरमध्ये जाऊन शेपूट घालतात.” अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

हे पण वाचा- “माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी कायम ‘मेरा परिवार, मेरा परिवार’ म्हणत असतात. पण मोदींनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली? परिवारातील लोक बेरोजगार बसले आहेत, भीक मागत आहेत. मग नुसतं ‘मेरा परिवार’ बोलून काय फायदा?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

आता या सरकारची मस्ती तुम्हाला घालवावी लागेल. निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी आहे. निवडणूक आयोग म्हणतं, ‘जय भवानी’ हा शब्द काढा. हा शब्द काढून प्रचारगीतात मोदींचं नाव टाकू का? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे, हे ठीक आहे. पण दैवतावरही तुमचा आकस आहे. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला नांदेडमधील चिखल साफ करायचा आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticized pm narendra modi over mangalsutra at nanded loksabha election rally scj