धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आले तर त्यांच्या मदतीला धावून जाईल, असे सूचक विधान केले होते. आता त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पाव उपमुख्यमंत्री असा करत भाजपावर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मी धाराशिवकरांच्या प्रेमाने आज भारावून गेलो आहे. मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलो आहे. दिल्लीश्वरांना वाटतं की, उद्धव ठाकरे काही करु शकत नाहीत. मात्र, तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. ७ तारखेनंतर ओमराजे निंबाळकर यांना बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला घेऊन जाणार आहे. तुम्ही सर्वजण दिल्लीच्या हुकुमशाहांचे तख्त जाळून टाकल्या शिवायशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे. मी येथे मत माघायला आलो आहे, ४०० जागांचे जुगाड लावायला नाही”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

हेही वाचा : राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”

ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. अमित शाह यांचे गुप्तहेर इकडे तिकडे फिरत असतात. पण मी त्यांना सांगतो, आमच्याकडे गुप्त असे काही नाही. आमच्याकडे उघडा बाजार असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परवा एक मुलाखत दिली. त्यामध्ये ते काहीतरी म्हणाले. यानंतर मला अनेकांनी मेसेज केले आणि विचारले मोदींना तुमचे प्रेम कसे आले. मीही त्यांना म्हटलं, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र, मोदींचे प्रेम एवढे उतू गेले आहे की, ते म्हणाले, शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम, अस्था आहे. मग मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माजी विचारपूस करायचे. मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हत का?”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“माझ्या आजारपणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे हे ठरवत होते. मग हे पंतप्रधान मोदी तुम्हाला माहिती नव्हतं का? आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांच्यावर कधी काही संकट आले तर मी धावून जाईल. पंतप्रधान मोदींवरही संकट आलं तर मीदेखील (उद्धव ठाकरे) धावून जाईल. फक्त तुम्ही महाराष्ट्र आणि देशावर संकट म्हणून आलात त्यावर आवर घाला. मग शिवसेना आणि भाजपाची युती तोडली तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरे कोण आहेत?”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes pm narendra modi in dharashiv lok sabha constituency politics gkt