“भाजपाने आजपर्यंत धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले? सध्या कांद्याची निर्यातबंदी सुरु आहे. केंद्र सरकार गुजरातच्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यातबंदी उठवतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कांद्याची निर्यातबंदी उठवत नाहीत, म्हणजे हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भेदभाव करत आहेत. मग गेल्यावेळी याच महाराष्ट्राने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून दिले होते. त्यामुळे मोदी तुम्ही दिल्ली पाहिली. मात्र, यावेळी महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही. आम्हाला विचारतात की, महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? आम्ही ४८ जागा लढवत आहोत आणि ४८ जागा जिंकणार”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज धुळ्यातील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरच्या सभेत बोलताना केलेल्या ‘एक्सपायरी डेट’च्या टीकेलाही प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये बोलताना म्हणाले, ४ जूनला आमची (इंडिया आघाडीची) एक्सपायरी डेट आहे. आहो तुमचा बुरशी आलेला माल लोकांनी पाहिला. तो ४ जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही या गोमूत्रधाऱ्यांना आता ओझं व्हायला लागली. त्यामुळे त्यांना ४०० पार खासदार करून संविधान बदलायचं आहे. मात्र, त्या संविधानाचे रक्षण आपल्याला करायचे आहे. या लोकांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
हेही वाचा : “४ जून ही इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’, त्यानंतर…”; नगरमधील सभेत पंतप्रधान मोदींचं विरोधकांवर टीकास्र!
“भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हे बहिण भावाच्या नात्यावर काय बोलले ते पाहा. हीच का भाजपाची संस्कृती. ज्यांना बहिण भावाचं नात माहिती नाही, ते भाजपावाले आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? तुमच्याकडून आम्ही हे हिंदुत्व शिकायचं का? ते म्हणतात की, नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. या देशात महिला सुरक्षित नाहीत. दिल्लीत आंदोलनास बसलेल्या खेळाडू महिलांकडे बघायला तुम्हाला वेळ नाही. मणिपूरात महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जात नाहीत. कर्नाटकातील प्रज्वल रेवन्ना फरार झाला. आता ४ जून पर्यंत थांबा, ५ जूननंतर तुम्ही सुरतच्या बिळात जरी लपलात तरी ते बीळ खोदून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
नगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, “४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही”, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. “आज देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपाला समर्थन मिळत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाने एक गोष्ट स्पष्ट केली असून ती म्हणजे ४ जून रोजी इंडिया आघाडीची ‘एक्सपायरी डेट’ निश्चित केली आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी सापडणार नाही. निवडणुकीपूर्वी जो भानूमतीचा कुणबा जोडला गेला, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला होता.