राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. तर त्याउलट तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यात भाजपाचा प्रभाव नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पार्श्वभूमीवर या चार राज्यांच्या निवडणूक निकालांवरून आता राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकांसंदर्भातली राजकीय समीकरणं मांडत असताना ठाकरे गटानं मात्र या पराभवावरून काँग्रेसमधील स्थानिक नेतेमंडळींना लक्ष्य केलं आहे. तसेच, या निवडणुकीत काँग्रेसनं इंडिया आघाडीचं तत्त्व पाळलं नसल्याचीही टीका करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपानं काँग्रेसला पराभू केलं आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून विजयाची समीकरणं स्पष्ट असल्याचे दावे केले जात होते. मात्र, तिथेही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमवीर सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Video: भाजपासाठी तेलंगणा का महत्त्वाचं होतं? जाणून घ्या निकालामागचं राजकीय समीकरण!

“कमलनाथ यांनी इंडिया आघाडीचे नियम पाळले नाहीत”

“मध्य प्रदेशात जिंकण्याची काँग्रेसला सर्वाधिक संधी होती, पण शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर कमलनाथ टिकले नाहीत. काँग्रेसची सूत्रे, तिकीट वाटप कमलनाथ यांच्या हाती होते. ‘इंडिया’ आघाडीचे नियम त्यांनी पाळले नाहीत. कमलनाथ यांनी अखिलेशना टाळले व समाजवादी पार्टीने स्वतंत्र उमेदवार उभे केले. काँग्रेसचे राज्याराज्यांतील लोकप्रिय नसलेले वतनदार राहुल-प्रियांका गांधींच्या मेहनतीवर पाणी टाकत आहेत”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Video: उत्तरेत काँग्रेस नाही, दक्षिणेत भाजपा नाही; कसं असेल देशाचं राजकीय भवितव्य? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

“ओवैसींचं भाजपाधार्जिणं धोरण”

“राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप जिंकले. हे मोदींचे यश व तसा जल्लोष भाजपने सुरू केला. मोदी यांना तेलंगणात यश का मिळाले नाही? तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव यांचा पराभव काँग्रेसने केला. भाजपला तेलंगणात दहा जागांचा टप्पाही गाठता आला नाही. मुख्य म्हणजे ओवेसी यांच्या एमआयएमचे भाजपधार्जिणे राजकारणही तेलंगणात चालले नाही. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

Video: तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

“यातून धडा घेऊन २०२४च्या तयारीला लागायला हवं”

“मध्य प्रदेश, राजस्थान या मोठ्या राज्यांवर भाजपने ताबा मिळविला. पंतप्रधान, गृहमंत्री, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे ‘टीमवर्क’ कामी आले व भाजपने विजय मिळवला. काँग्रेस पक्षाने ‘इंडिया आघाडी’ म्हणून टीमवर्क केले असते तर कामगिरीत अधिक चमक दिसली असती, पण चुका झाल्या आहेत. त्यातून धडा घेऊन २०२४ च्या तयारीस लागायला हवे. मध्य प्रदेश, राजस्थान जिंकण्यासाठी भाजपने केंद्रातल्या मंत्र्यांना निवडणुकीत उतरवले, पण काँग्रेसने राज्यातील ‘इंडिया’ आघाडीच्या सहकाऱ्यांना सोबतीला घेतले नाही”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून काँग्रेसवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams congress for rajasthan madhya pradesh chhattisgarh results pmw