काँग्रेसचा अजेंडा हा आहे की त्यांचं सरकार आलं तर ते काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करतील. सीएए रद्द करतील असं सांगत आहेत. काँग्रेस आणि इंडि आघाडीकडून हे लांगुलचालन केलं जातं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या लोकांची लोकसभा निवडणूक तीन अंकी संख्या गाठेपर्यंत दमछाक होणार आहे असे लोक सरकार आणू शकतात का? असा प्रश्नही मोदींनी विचारला.
काँग्रेसने अयोध्यतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं
अयोध्येत राम मंदिर बांधलं गेलं आहे. ५०० वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं. अनेक दशकं काँग्रेसने मंदिर बांधू दिलं नाही. मात्र मंदिर बांधल्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही काँग्रेसचे लोक आले नाहीत. काँग्रेसचं अधःपतन झालं आहे तरीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रणही त्यांनी नाकारलं अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? काँग्रेसच्या लोकांनी आरशात चेहरा पाहिला पाहिजे. अयोध्या प्रकरणात अन्सारी कुटुंब लढा देत होतं. मात्र न्यायालयाने त्या ठिकाणी मंदिर होतं हा निर्णय दिला होता तेव्हा अन्सारी कुटुंबातले सदस्यही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते. आयुष्यभर लढले पण शेवटी रामाच्या चरणी आले. मात्र काँग्रेसवाल्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार घातला. त्यांचं काय करायचं ते तुम्हीच बघा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हे पण वाचा- “पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या आणि हिमालयात..”, मार्कंडेय काटजूंचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत निशाणा
डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जे औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. नकली शिवसेना या सगळ्या अजेंड्यात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळतळत असेल. जे काही कारनामे चालले आहेत ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील असं म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
राहुल गांधींवर टीका
काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे. काँग्रेसचं हे स्वप्न तुम्ही अपूर्ण ठेवायचं आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.