महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा अखेरचा पाचवा टप्पा २० मे रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बुधवारी (१५ मे) नाशिकमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवेसना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा पक्ष ५ जून रोजी फूटणार असून नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर राहणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. तसेच २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी मोदींसाठी मतं मागितली, ही माझी चूक झाली असल्याची कबुलीही उद्धव ठाकरे यांनी दिली.
हे वाचा >> उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका, “चपराशी झालो तरीही पुन्हा येईन..”
नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांनाही उत्तर दिले. शिवसेना उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा आरोप मोदींनी नाशिकमध्ये केला होता. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, “तुम्ही माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार म्हणता. पण मला आमच्यापेक्षा भाजपाची जास्त चिंता आहे. आम्ही भाजपाबरोबर ३० वर्ष राहिलो, पण कधी भाजपात विलीन नाही झालो. मतदारांनी मात्र मोदींना माजी पंतप्रधान करायचे, हे ठरविले आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाचे काय होणार? ५ जून नंतर भाजपामध्ये फूट पडणार.”
इंडिया आघाडीचा नेता कोण असणार? पंतप्रधान कोण होणार? याबद्दल पंतप्रधान मोदींनी अनेक सभांमधून प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. “मोदींनी इंडिया आघाडीची चिंता करू नये. उलट तुमच्यानंतर कोण? याबद्दल काही नियोजन भाजपाने केले आहे का? तुम्ही माजी पंतप्रधान होणार आहात. त्यामुळे पक्षाला पुढे घेऊन जाणारा एकही नेत भाजपाकडे नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. याचाही पुर्नउच्चार ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातून ४० खासदारांचे पाठबळ भाजपाला मिळाले. तरीही राज्यातील उद्योग पळवून नेऊन गुजरातला दिले गेले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी दुजाभाव केला गेला. त्याचवेळी गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी सोयीचे निर्णय घेतले. गुजरातच्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
मी २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मोदींना मतं द्या असे सांगायला आलो होतो, ही माझी चूक झाली. त्यासाठी मी महाराष्ट्राची माफी मागतो आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.