महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे दोन दिवस बाकी आहे. हा प्रचार अंतिम टप्प्यात असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून जाहीर सभा घेतल्या जात आहेत. तसेच या सभांमधून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या आहेत. अशातच ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मुस्लीम मतांच्या लाचारीसाठी वोट जिहाद करण्याचा प्रयत्न होत असून आता आपल्याला मतांचे धर्मयुद्ध लढावं लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांच्या याच टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाण्यातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. आम्ही आमच्या प्रचार गीतात जय शिवाजी, जय भवानी बोललो, तर यांच्या डोळ्यात खुपते. हिंदू आमचा धर्म आहे, असं बोललो तर तेही त्यांच्या डोळ्यात खुपतं, आणि हे महाशय आता धर्मयुद्ध करायला निघाले आहेत. खरं तर फडणवीसांनी आधी स्वत:चं जॅकेट सांभाळावं, मग धर्मयुद्ध करावं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. जर तुम्ही तुमचं मत मिंधेंना दिलं किंवा मिंधेंच्या बरोबर असलेल्या भाजपाला दिलं, किंवा मिंधे आणि भाजपाला मदत करणाऱ्या गुनसेला दिलं, म्हणजे, गुजरात नवनिर्माण सेनेला दिलं, तर तुम्ही महाराष्ट्र द्रौह्यांना मदत कराल, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच आधी ती मनसे होती, आता ती गुनसे झाली आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं होतं?
सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातो आहे. या वोट जिहादचे मुख्य सुत्रधार कोण? हे आताच तुम्ही ऐकलं. मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांची तवळे चाटत आहेत. हे लोक सांगतात, की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ. या ठिकाणी वोटजिहाद होत असेल, तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल. आता आपण एक राहलो, तरच सेफ ( सुरक्षित) राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.