लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या चालू आहे. यंदा ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झालं आहे. तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुंबईच्या वांद्रे भागात (कलानगर) राहतात. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या २० मे रोजी मतदान करणार आहे. दरम्यान, २० मे रोजी उद्धव ठाकरे कोणत्या उमेदवाराला मतदान करणार यावर त्यांनी स्वतः भाष्य केलं आहे.
कलानगरसह वांद्रे हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असून काँग्रेसने या मतदारसंघातून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मविआच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर वर्षा गायकवाड यांना म्हणाले, “या निवडणुकीत शिवसेना तुमच्याबरोबर आहेच, त्याचबरोबर माझंही मत तुम्हाला मिळणार आहे.” यावर वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हसून दाद दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत माझं मत वर्षा गायकवाडांना मिळणार आहे. मी त्यांचा मतदार आहे. आम्ही यावेळी काँग्रेसच्या पंजावर मतदान करणार आहोत. त्या पंजामध्ये आमची मशाल आहे. काँग्रेसच्या हातात शिवसेनेची मशाल आहे. आम्ही त्यावर मतदान करणार आहोत आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात तुम्हा सर्वांना दिसतील. त्यानंतर आम्ही तुतारी फुंकणार आहोत.
हे ही वाचा >> “मी गेल्या जन्मी पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असेन”, नरेंद्र मोदी असं का म्हणाले? ममता बॅनर्जींचा उल्लेख करत म्हणाले…
वर्षा गायकवाडांविरोधात कोण?
मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा विजय मिळवला. मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघात कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.