बोईसर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. तसंच गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. एक ही भूल कमल का फूल या जु्न्या घोषणेची आठवणही उद्धव ठाकरेंनी बोईसरकरांना करुन दिली. वाढवणला विरोध असतानाही त्यांना हा प्रकल्प इथे आणायचा आहे आणि अदाणींच्या घशात घालायचा आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक फिरत आहेत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी. जी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केली त्या शिवसेनेला नकली आहे. बोला काय बोलायचं आहे पण हा भेकड, भ्रष्ट पक्ष आहे. या पालघरमधूनच ईडी सीबीआयच्या बंदुका लावून गद्दारांना घेऊन गेले. माझा पक्ष चोरला, वडील चोरले. मात्र भगवा झेंडा आणि निष्ठावान लोक माझ्याबरोबर आहे. जो यांना देईल साथ त्यांचा करणार घात हे यांचं घोषवाक्य आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा- उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
पालघरकरांना काय न्याय देणार मोदी?
मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून भाजपासह राहिली. आज तेच लोक शिवसेना मूळापासून संपवू पाहात आहेत. असे लोक पालघरकरांना काय न्याय देऊ शकणार आहेत?आम्हाला नकली शिवसेना म्हणत आहेत. मात्र अमित शाह यांना विचारु इच्छितो तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिले आहेत? की सगळ्या स्टेपन्या आत बसल्या आहेत. याला फोड, त्याला फोड ही यांची वृत्ती आहे. कुणी काय काम केलं या मुद्द्यांवर निवडणूक लढून दाखवा ना.मी महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात काय केलं ते सांगतो, तुम्ही दहा वर्षांत काय केलं ते सांगा असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
प्रत्येक सभेत माझा उद्धार का करता?
उद्धव ठाकरेंना जर तुम्ही संपवलं आहे तर मग प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेचा उद्धार का करता? अमित शाह यांनी तर चीनला उत्तर द्यायला पाहिजे. तिकडे शेपट्या घालता. चीन घुसला तरीही चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. माझं आव्हान आहे मला संपवून दाखवा. देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी तु्म्हाला निवडून दिलं होतं. पण तुम्ही इथे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालता? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.