सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर टोकाची टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी ठाकरी शैलीत टीका केली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र त्यांनी मैत्री आणि राजकारण वेगळं ठेवलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“हल्ली कुणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते. कारण हल्लीचे मित्र हे पाठीवर वार करणारे आहेत. आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले. शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे. कमळाबाईचे नेते नरेंद्र मोदी येऊन गेले. सध्या ते महाराष्ट्रभर आणि देशभर फिरत आहेत. लोकांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम जोरात सुरु आहे. कोपराला गूळ लागला की धड चाटताही येत नाही आणि काढताही येत नाही.” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

तुळजा भवानीचं नाव घेऊन दाखवा

“आम्हाला नकली सेना म्हटल्यावर मी काही सोडतो का? मी उत्तर देणारच. उद्या मोदी धाराशिवला येत आहेत. एकतर जाहीर मागणी मी करतो. समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेचं नाटक केलं होतं. तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. मोदीजी तुम्ही धाराशिवला येत आहातच तर भवानीमातेचं दर्शन घ्या, तुमच्या भाषणाची सुरुवात तरी तशी करा. तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन वगैरे म्हणा. तसं बोलला नाहीत तर तुमच्या मनात भवानीमातेबाबत आकस आहे असं महाराष्ट्र समजेल. निवडणूक आयोग या तुमच्या घरगड्याला सांगा की भवानी शब्दाचा आक्षेप काढ. गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंसह नरेंद्र मोदींवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्र वाट बघतो आहे.” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

मशालीची धग तुमचं कमळ कोमेजून टाकणार

आज या मशाली पेटल्या आहेत. कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं आता मशालीची धग काय ते बघा. मशालीच्या धगीमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजतं ते बघा. तुम्ही कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे? शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुम्ही कुठेतरी हिमालयात किंवा कुठेतरी रेल्वे स्टेशनवर असाल. शिवसेनाप्रमुखांनी कठीण काळात तुम्हाला सांभाळलं. अटलजींनी केराच्या टोपलीत गेला असतात तर दहा वर्षे भोगायला मिळाली नसती. ४८ पैकी ४२ खासदार दिले होते. शिवसेना बरोबर होती त्यामुळे त्या तख्तावर बसला होतात आता त्या तख्तापर्यंत आम्ही तुम्हाला पोहचू देणार नाही. तुमच्या भाजपाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झाला आहे. पैसे देऊन माणसं आणावी लागत आहेत. माझ्या सभेत कुणी पैसे घेऊन आलेलं नाही. याला प्रेम म्हणतात. देशातले सगळे प्रश्न संपले आहेत आणि फक्त महाराष्ट्रात शिवसेनाच शत्रू आहे असं तुम्हाला वाटतं. टरबूज वगैरे जाऊद्या.. टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहीत आहे. टरबूज उन्हाळ्यात कामी तरी येतं. हे दुष्काळात तेरावा महिना आहे. हे टरबूज नाहीच दिवाळीत चिरडता ते चिराट झालेत. आले तेव्हा टरबूज होते आता पाव उपमुख्यमंत्री म्हणजेच चिराट झाले आहेत. असं सगळं थापेबाजीचं राजकारण सुरु आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले.

हे पण वाचा- “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

मोदींना कडवट हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे

“मोदींना आमची कडवट हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे. रत्नागिरीत मी बोललो की २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींबाबत आम्हाला अभिमान होता. एक अकेला सब पे भारी म्हणत होते. आता आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी आहेत. कुठून ही अवदसा तुम्हाला सुचली माहीत नाही. यांना आपली शिवसेना नको आहे. यांना ही नकली शिवसेना वाटते आहे.

सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही मोदींना चालते

घरी गेल्यावर रविश कुमार म्हणून पत्रकार आहेत. त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रज्ज्वल रेवण्णांचा उल्लेख आहे. त्याचे पॉर्न व्हिडीओ बाहेर आले आहेत. मोदी स्टेजवरुन सांगत आहेत त्याला मत दिलं की माझे हात बळकट होतील. असे लोक तुम्हाला पाहिजेत? कळकट हात बळकट करतील? अटलजींचा आत्मा रडत असेल की कुठल्या नाकर्त्यांच्या हाती आपण पक्ष देऊन टाकला. ही घराणेशाही त्यांना चालते. सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही चालते पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. आमची घराणेशाही जनता ठरवेल. मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास मांडतो तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा जनतेला ठरवू देत कुठली घराणेशाही हवी.” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams narendra modi and devendra fadnavis in his solapur speech scj