लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. ठाकरे गटानं गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या प्रचारगीतामधील काही शब्दांवर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला असून ते शब्द गाण्यातून काढून टाकण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. यासंदर्भात आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. तसेच, यावेळी त्यांनी मोदी व शाहांचे दोन व्हिडीओही पत्रकार परिषदेत दाखवले.
निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला नोटीस
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटिशीची माहिती दिली. “गेल्या आठवड्यात आम्ही आमचं मशाल गीत सर्वांसमोर ठेवलं होतं. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र दिलं आहे. त्या गाण्यातले दोन शब्द काढायला लावले आहेत. ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म’ यातला ‘हिंदू धर्म’ हा शब्द त्यांनी काढायला लावला आहे. आम्ही यात कुठेही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलेलं नाही. पण आम्ही हिंदू धर्म सोडला अशी आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या आयोगाने आता त्यावर बोलावं”, असं ठाकरे म्हणाले.
“या गाण्याच्या कोरसमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा आहे. त्यातला जय भवानी हा शब्द काढा, हा निवडणूक आयोगाचा फतवा आम्हाला आला आहे. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल इतका द्वेष, आकस त्यांच्या नसानसांत ठासून भरला असेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. आज जय भवानी काढायला लावताय, उद्या जय शिवाजी काढायला लावाल”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी-शाहांच्या भाषणाचे व्हिडीओ!
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणाचे दोन व्हिडीओ दाखवले. यात त्यांनी केलेल्या उल्लेखांचा संदर्भ देत आयोगानं आधी त्यांच्यावर कारवाई करावी, मग आमच्यावर करावी, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.
उद्धव ठाकरेंचं ‘लाव रे तो व्हिडीओ’
“मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये निवडणूक झाली त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे एका मुद्द्यावर लेखी विचारणा केली होती”, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी दोन व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या. यात “जेव्हा मतदानासाठी बटण दाबाल, तेव्हा जय बजरंग बली म्हणून बटण दाबा”, असं मोदी म्हणताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये “आया-बहिणींना अयोध्येत दर्शन करायचं आहे, खर्चही होईल. पण मी सांगतो नाही होणार. ३ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार बनवा, हे सरकार सगळ्यांना मोफत रामलल्लाचं दर्शन घडवेल”, असं अमित शाह म्हणताना दिसत आहेत.
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
“पंतप्रधान कचाकच बटण दाबा म्हणाले नाहीत, पण…”
“आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पंतप्रधान मोदी व अमित शाहांना आयोगाने सूट दिली आहे का? कायद्यात काही बदल केला आहे का? पंतप्रधान व गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटण दाबायला सांगतायत. अगदी कचाकचा नसतील म्हणत, तरी बटण दाबायला सांगत आहेत. हे निवडणूक आचार संहितेतील नियमानुसार आहे का? वारंवार स्मरणपत्र देऊनही आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.