Uddhav Thackeray महाराष्ट्राचा महानिकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीची धूळधाण उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या आहते. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण होणार?

एकनाथ शिंदेंची भूमिका काय?

एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची भूमिका जाहीर केली. एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ ही ओळख माझ्यासाठी कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मुख्यमंत्री कुणीही झालं तरीही शिवसेनेचा पाठिंबा असेल. तसंच एकनाथ शिंदे त्यात अडसर असणार नाही. नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. दरम्यान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेनाही शांत बसलेली नाही. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) कुटुंबासह देश सोडतील अशी टीका शिवसेनेच्या नेत्याने केली आहे.

रामदास कदम यांची शिर्डीमध्ये पत्रकार परिषद

रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिलाय. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

रामदास कदम पुढे म्हणाले की, मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील, हे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलंय, त्या पापाचं प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray) भोगावंच लागेल, अशी टीका त्यांनी केली.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोठी जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. याबाबत रामदास कदम म्हणाले की, १८ ते २० तास महाराष्ट्रात जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पहिलाच आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असतानाही आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपाचे १३२ आमदार आहेत. त्यामुळे आम्ही किती मागावे, काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Story img Loader