देशाची प्रतिमा जगभरात उंचावली आहे याचं सगळं श्रेय पंतप्रधान मोदींचं आहे. मला जी जागा लढवण्यासाठी देण्यात आली आहे ती महत्त्वाची आहे. मनोहर जोशींनी ही जागा लढवली आहे. असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. आज उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकहिताचे कायदे कसे होतील हे पाहणार
माझा हाच प्रयत्न असेल की देशात जे नवे कायदे येतील, ते लोकहिताचे कसे असतील हे पाहण्याचा माझा प्रयत्न असेल. आपल्या देशात विविध जाती-पंथाचे लोक राहतात. आपल्या लोकशाहीचं उदाहरण जगात दिलं जातं त्यामुळे मी अशाच गोष्टी करेन. मला उलटसुलट प्रश्न राजकारणाबाबत विचारु नका. अशीही विनंतीही उज्ज्वल निकम यांनी केली.
उज्जवल निकम यांना उमेदवारी, पूनम महाजन यांचा पत्ता कट
भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती.
हे पण वाचा- “निवडणूक आयोगाची मोठी चूक अन्…”, उज्ज्वल निकमांचं आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य
वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा रंगणार सामना
दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका जाहीर केली. विरोधकांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपाच्या गोटातही उमेदवार ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. अखेर आज उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. निकम यांच्या नावाच्या घोषणेमुळे पूनम महाजन की आशिष शेलार? यापैकी कोण? ही चर्चाही संपुष्टात आली आहे.