Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बंजारा समाजाच्या ३० महिलांनी एकत्र येऊन बोम्मई यांच्याविरोधात उभे राहण्याचे आव्हान दिले. बोम्मई हे मागच्या तीन निवडणुकांपासून शिग्गाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या वेळी बंजारा महिलांनी गिरीश डीआर या अपक्ष उमेदवाराला आपला नेता म्हणून जाहीर केले आहे, तसेच त्याच्या प्रचारासाठी त्या एकत्र आल्या आहेत. गिरीश हा बंजारा विद्यार्थी संघटनेचा कर्नाटक प्रदेशप्रमुख आहे. बोम्मई यांच्या विरोधात आपण विजय मिळवूच असा विश्वास गिरीशने व्यक्त केला. बोम्मई यांच्या विरोधात बंजारा महिलांनी एकत्र येण्याचे कारणही फार गंभीर आहे. बोम्मई यांच्या मतदारसंघात २०१० ते २०१७ या काळात अनेक बंजारा महिलांचे गर्भाशय त्यांच्या संमतीशिवाय काढून टाकण्यात आले होते. याबाबत बंजारा समाजाची बोम्मई यांच्या विरोधात नाराजी आहे. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिग्गाव विधानसभा मतदारसंघात बंजारा आणि इतर मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या जवळपास १५ हजार एवढी आहे. हे सर्व लोक गिरीशच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. बंजारा महिलांचे नेतृत्व करणाऱ्या ललिथाम्मा म्हणाल्या की, आम्ही सात वर्षांपासून बोम्मई यांच्याकडे उत्तर मागत आहोत. २०१६ साली पहिले प्रकरण उजेडात आले होते. “हावेरी जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध बंजारा तांड्यांवरील जवळपास ८०० महिलांना सरकारने पीडित म्हणून जाहीर केले होते. या महिलांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही,” अशी माहिती ललिथाम्मा यांनी दिली. हावेरी जिल्ह्यातील रानेबेन्नूर सरकारी रुग्णालयात बंजारा समाजाव्यतिरिक्त इतरही समाजांतील महिला या रॅकेटच्या बळी ठरल्या आहेत,असेही त्या म्हणाल्या.

हे वाचा >> Karnataka Election : “मी पळून जाणारा मुख्यमंत्री नाही,” बसवराज बोम्मई यांचे सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्र

ललिथाम्मा यांनी सांगितले की, २०१३ साली पोटात दुखत असल्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या होत्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. लवकर शस्त्रक्रिया केली नाही तर मृत्यू होऊ शकतो, असेही ते म्हणाले. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेणे वैगरे काही प्रकार माहीतच नव्हता. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. २०१० ते २०१७ दरम्यान अशाच प्रकारे पोटदुखीमुळे रुग्णालयात गेलेल्या महिलांचे गर्भाशय शस्त्रक्रियेच्या नावाखाली काढून टाकण्यात आले आहे, हे समजण्यासाठी काही वर्षे लागली. हावेरी जिल्ह्यातील निंगेकल्ली तांडा, हल्ली तांडा, हट्टीमुथ्थुर, क्रिष्णापूर तांडा, शिरबुडागी आणि शिवपूर तांडा या ठिकाणच्या शेकडो महिलांची अशाच प्रकारे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ललिथाम्मा यांच्या दाव्यानुसार पद्मावथी तांड्यातील ३५ महिलांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. यांमध्ये काही अविवाहित मुलीदेखील होत्या.

हुवाक्का लमानी यांनी तर गिरीशचा उमेदवारी अर्ज भरत असताना स्वतःच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज समरीची कागदपत्रेही सोबत आणली होती. सरकारी रुग्णालयात उपचार घेत असतानाही येथील डॉक्टरने रुग्णालयाबाहेरील खासगी मेडिकलमधून औषध आणण्यासाठी दबाव टाकला होता. त्या दुकानातून औषधे घेण्यासाठी आम्ही ३० हजार रुपये मोजले, तेव्हाच आमचा संशय बळावला होता. हुवाक्का पुढे म्हणाल्या की, ज्या महिलांवर शस्त्रक्रिया झाल्या, त्यांचे वय २० ते ४० दरम्यान होते.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत चौकशी करून २६८ महिलांवर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली असल्याचे समोर आले. डॉक्टर शांत पद्दानर यांच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले. मात्र काही दिवसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याची इतरत्र बदली करण्यात आली. २०१७ साली आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सांगितले की, सदर प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात येईल. मात्र सीआयडीने या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास खूप उशीर केला. जेव्हा एफआयआर दाखल केला, तेव्हा कठोर कलमांचा वापर केला नाही. वैद्यकीय निष्काळजीपणासारखा गंभीर गुन्हाही दाखल झाला नाही.

हे वाचा >> किच्चा सुदीप यांचा बसवराज बोम्मईंना पाठिंबा, प्रकाश राज यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

त्यामुळेच या विषयावर अनेक पीडित महिला एकत्र झाल्या. ललिथाम्मा म्हणाल्या की, करोना महामारीनंतर आम्ही नुकसानभरपाई मिळावी यासाठी आंदोलने केली. ज्या महिलांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या त्यांना आता मेहनतीची कामे करता येत नाहीत. पोटात दुखत असल्यामुळे मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी रानेबेन्नूर ते शिग्गाव येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानी पीडित महिलांनी मोर्चा काढला. त्या वेळी सरकारकडून पीडितांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अद्यापपर्यंत कुणालाही मदत मिळालेली नाही.

हावेरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एमएम हिरेमठ यांनी सांगितले की, जर काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही या महिलांना नुकसानभरपाई मिळवून देऊ. आमचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी पीडित महिलांची काही दिवसांपूर्वीच भेट घेऊन त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपाचे हावेरी जिल्ह्याचे प्रमुख म्हणाले की, सरकारला या पीडित महिलांचे प्रश्न चांगले माहीत आहेत. आम्ही लवकरच त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

तर बोम्मई यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या गिरीशने सांगितले, “मुख्यमंत्री बोम्मई यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. तसेच ज्या महिलांचे गर्भाशय काढून टाकण्यात आले, त्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केलेले नाही. ही निवडणूक लढवून आम्ही आमचा मुद्दा पुढे रेटू पाहत आहोत.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unheard for 7 yrs victims of a hysterectomy racket take their battle to cm bommais seat kvg