उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जसजशी अंतिम टप्प्याजवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे राजकारण चांगलंच रंगू लागलं आहे. दरम्यान निवडणुकीत सध्या गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा मुद्दा चर्चेत आहे. भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर गौतम बुद्धाचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे. एकीकडे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी व्हिडीओ ट्वीट करत अखिलेश यादव यांना भगवान गौतम बुद्धांचा इतका द्वेष का आहे अशी विचारणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अखिलेश यादव यांच्यावर टीका केली असून गौतम बुद्धांची मुर्ती स्वीकारली नाही पण चांदीचा मुकूट लगेच घेतला असं म्हटलं आहे.
केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट केला व्हिडीओ
केशव प्रसाद मौर्य यांनी सात मिनिटांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. व्हिडीओमध्ये अखिलेश यादव मंचावर उपस्थित दिसत आहे. यावेळी त्यांना गौतम बुद्धाची मुर्ती भेट दिली जात असताना ते एका बाजूला ठेवण्याचं सांगत असल्याचं दिसत आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी व्हिडीओ ट्वीट करत अखिलेश यादव यांना गौतम बुद्धांचा इतका द्वेष का? अशी विचारणा केली आहे.
पंतप्रधान मोदींची टीका
बुधवारी कौशांबी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेख करत अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. “हे कुटुंबवादी कशा पद्धतीने दलितांचा अपमान करत आहेत हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे”, असं मोदी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यांना गौतम बुद्धांची मुर्ती स्वीकारणंदेखील मान्य नाही. त्यांना गौतम बुद्धांची मुर्ती स्वीकारावी वाटत नाही, पण चांदीचा मुकूट पाहिला तर लगेच तोंडाला पाणी आलं आणि तो घेतला”.
काय आहे प्रकरण?
व्हिडीओ मंगळवारचा आहे जेव्हा अखिलेश यादव यांनी कौशांबी येथील सिराथू येथे एक प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांना मंचावर असताना सर्वात प्रथम भगवान गौतम बुद्ध यांची एक मुर्ती भेट देण्यात आली. मात्र अखिलेश यांनी मुर्तीला हात न लावताच ती बाजूला ठेवण्यास सांगितलं. यानंतर त्यांना चांदीचा मुकूट दिला असता तो त्यांनी घातला. यामुळे भाजपाने त्यांच्यावर टीका सुरु केली आहे. समाजवादी पक्षाने मात्र सात सेकंदाचा व्हिडीओ टाकत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आऱोप केला आहे.