उत्तर प्रदेशमध्ये सध्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यादरम्यान लखीमपूर खिरी येथे मतदान केंद्रावर एक अजब घटना समोर आली आहे. कादीपूर सानी येथील एका ईव्हीएम मशीनमध्ये काही जणांनी फेविक्विक टाकलं. यामुळे जवळपास दीड तास मतदान खोळंबलं होतं,
माजी आमदार आणि समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार उत्कर्ष वर्मा यांनी सांगितलं आहे की, “कोणीतरी खोडसाळपणा करत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आमच्या बटणमध्ये फेविक्विक टाकलं. यामुळे बटण दाबलं जात नव्हतं. आम्ही तक्रार केली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली. पण जवळपास दीड तास मतदान थांबलं होतं”.
उत्कर्ष वर्मा यांनी पुढे सांगितलं की, “ज्यांनी हा खोडसाळपणा केला आहे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. सीसीटीव्हीत त्याचा चेहरा कैद झाला असेल. सेक्टर मॅजिस्ट्रेटकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या क्रमांकाच्या बटणावर फेविक्विक टाकण्यात आलं होतं”.
मतदान करण्यासाठी रांगेत उभ्या एका मतदाराने सांगितलं की, “सकाळपासून येथे मतदान सुरु आहे. आम्ही रांगेत उभं असतानाच कोणीतरी ईव्हीएमवर फेविकॉल लावण्यात आलं असून बटण दाबलं जात नसल्याचं सांगितलं. आम्ही दोन तासांपासून उभे होतो. अनेक अधिकारी येऊन गेले”.
लखीमपूर खेरी येथे आठ जागांसाठी मतदान सुरु आहे. लखीमपूरमध्ये खासदार आणि गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मतदारसंघातही मतदान सुरु आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यामुळे अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या मुलाला जामीन मिळाला आहे. त्यामुळे भाजपासाठी येथील निवडणूक आव्हानात्मक आहे.