मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून तसंच राजकीय नेत्यांकडून वारंवार लोकांना आवाहन केलं जात असतं. देशात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुक होत आहे. उत्तर प्रदेशातही निवडणूक होत असून याच पार्श्वभूमीवर लखनऊत एका कॉलेजच्या प्राध्यपकांनी मतदान वाढवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. प्राध्यापकांनी मतदान करणाऱ्या पालकांच्या मुलांना १० अतिरिक्त गुण देण्याचं आश्वासन दिलं आहे.
लखनऊच्या क्रिस्ट चर्च कॉलेजचे प्राध्यापक राकेश कुमार यांनी मतदान वाढवण्यासाठी तसंच अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
“२३ फेब्रुवारीला तसंच इतर दिवशी मतदानात सहभागी होणाऱ्या पालकांच्या मुलांना आम्ही १० मार्क देण्यात येणार आहेत. १०० टक्के मतदान व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यामुळे उत्तीर्ण होण्यास मदत होईल,” असं राकेश कुमार यांनी सांगितलं आहे.
१० फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक होत आहे. २३ फेब्रुवारीला निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे. ७ मार्चला शेवटचा आणि सातवा टप्पा पार पडेल. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.