Uttar-Pradesh Assembly Election Live Updates: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही राज्यांमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.
UP Assembly Election Result 2022 Live News : उत्तर प्रदेशात योगी इतिहास रचण्याच्या तयारीत; सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणार
उत्तर प्रदेशातील खेडोपाडी, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोठा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याणावरील अढळ विश्वासाचा विजय आहे. जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भीती आणि भ्रष्टाचारमुक्त सुशासनावर शिक्कामोर्तब केले आहे. या प्रचंड विजयाबद्दल मी उत्तर प्रदेशच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
जेव्हा आपण राज्यात करोनाशी लढत होतो, तेव्हा हे लोक भाजपा आणि सरकारविरोधात कट रचण्याचे काम करत होते. आज पुन्हा एकदा भाजपाने या सर्वांना धडा शिकवला असून त्यांची बोलती बंद करण्याचे काम केले आहे. राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन या मुद्द्यावर आपण जे मतदान केले आहे, ते आपण सर्वांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले पाहिजे. राज्यातील निम्म्या लोकसंख्येला माता, बहिणी आणि मुलींनी ज्या प्रकारे पाठिंबा दिला त्यामुळे भाजपा राज्यात इतिहास घडवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या यशस्वी नेत्याच्या नेतृत्वात एवढं प्रचंड बहुमत मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.
आदरणीय पंतप्रधानांचे आभारी आहोत ज्यांनी उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ दिला. उत्तर प्रदेशच्या विकासासोबतच उत्तर प्रदेशसारख्या राज्यात सुशासन प्रस्थापित करण्याच्या मार्गात आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
राज्याची विशालता पाहता सर्वांच्या नजरा यूपीकडे होत्या. आम्हाला बहुमताने विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहोत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांच्या निकालाचा नेमका अर्थ काय आहे? यावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून पाच राज्यांमध्ये झालेला पराभव मान्य केला आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दल असणारी ती दंतकथा खोटी ठरवली आहे.
उत्तर प्रदेशचा कोणताही मुख्यमंत्री नोएडामधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात गेला तर तो पुन्हा सत्तेत येत नाही अशी गेल्या तीन दशकांपासून दंतकथा आहे. पण योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता मिळवत हे खोटं असल्याचं सिद्ध केलं.
आदित्यनाथ गोरखपूर अर्बन मतदारसंघातूनही विजयी होत आहेत. याशिवाय गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील तिन्ही भाजपा उमेदवारही विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
मेरठमधील सर्व तिन्ही जागांवर राष्ट्रीय लोक दल आणि सपा युतीच्या उमेदवारांचा पराभव होत आहे. अखिलेश आणि जयंत यांनी मेरठमधील सभेत सर्वात प्रथम युतीची घोषणा केली होती.

उत्तर प्रदेशात भाजपा पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे की, "आमचं सरकार हे आम्हाला आधीच माहिती होतं. बुल्डोझरसमोर काहीच टिकू शकत नाही. सायकल असो किंवा अन्य काही एका मिनिटात ते संपवून टाकेल," असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशात सध्या नेमकं चित्र काय आहे जाणून घ्या (सविस्तर बातमीसाठी)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विजय पक्षांचं अभिनंदन केलं आहे. पराभव पचवणं सोप्पं असते, विजय पचवायला शिकायला हवं. सुडाने राजकारण न करता, लोकांच्या हितासाठी काम करा असं यावेळी ते म्हणाले आहेत.
भाजपातून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगरमधून २१ हजार मतांनी पराभूत झाले आहेत.
उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला अपयश आल्यानंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत टीका केली असून "महाराष्ट्रातील 'मिसळ' सत्तारूढ पक्षांनी आता आपली तोंडं बंद करावीत," असा टोला लगावला आहे.
"माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. देशातील काँग्रेस व अन्य पक्षांनी या निवडणुकांच्या निकालातून एक बोध घ्यावा, टीका करून निवडणूक जिंकता येत नाही आणि लोकांचा विश्वासही संपादन करता येत नाही," असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही. ते उत्तर प्रदेशात एकटे लढले आहेत. तिथे, जी मत त्यांना पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असं शरद पवार म्हणाले आहेत.
“पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाब सोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.
"पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. पण तिथे तीन चार महिन्यांमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाचा स्विकार पंजाबच्या जनतेने केला नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता," असं शरद पवार म्हणाले.
दिल्लीतल्या कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाल्याचंही शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले आहेत. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
उत्तर प्रदेशात भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन

गोवा आणि युपीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. "अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील... शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात," असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
"इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार, उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो, उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा...झंझावाती दौरा...सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले...अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल...हारले..“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”, असंही ते म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता येत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमधील कार्यालयाबाहेर होळी खेळत सेलिब्रेशन केलं.
काँग्रेसने राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते घाबरायचं की नाही हा आपला निर्णय असल्याचं सांगत आहे. यावेळी ते आपण घाबरणार नाही असंही सांगताना व्हिडीओत दिसत आहेत.
गोरखपूरचे आमदार आणि भाजपा नेते रवी किशन यांनी भाजपाच्या विजयाचं सेलिब्रेशन करत मिठाईचं वाटप केलं. "मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना तळागळापर्यंत जाऊन काम करण्याची शिकवण दिली असून त्यामुळेच हा विजय झाला आहे. ही राम राज्याची सुरुवात आहे," असं रवी किशन म्हणाले आहेत.
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील यामध्ये सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. "गोवा आणि युपीत 'म्याव म्याव' चा आवाज ऐकू आला नाही भाई, किती वाईट, मला फार दु:ख झालं," असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशातील सर्व जागांचे कल हाती आले असून एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपा २६७ तर समाजवादी पक्ष १२५ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून बसपा आणि ते फक्त चार जागांवरच आघाडीवर आहेत.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत अखिलेश यादव यांना टोला लगावला आहे. "नई हवा है। सपा सफ़ा है। बेवजह अखिलेश ख़फ़ा हैं!," असं उपहासात्मकपणे ते म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशात भाजपाचा विजय स्पष्ट दिसू लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेनशनला सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत विरोधकांना टोला लगावला आहे. 'हिजाब' तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय...चप्पा चप्पा भाजपा असं ट्वीट त्यांनी केलं आहे. #bjpwinningup असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने जबरदस्त आघाडी घेतली आहे. भाजपा २४८ जागांवर पुढे असून बहुमताचा आकडा पार केला आहे. समाजवादी पक्ष १०१ तर काँग्रेस आणि बसपा फक्त ८ जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे. नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला. उत्तर प्रदेशसहित मणिपूर, उत्तराखंड आणि कदाचित गोव्यातही भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडे सत्ता जाण्याची चिन्हं आहेत. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी)
उत्तर प्रदेश निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. भाजपाला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंग चौहान यांचाही समावेश होता. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताना योगी सरकारवर आपल्या समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला.
समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोक दल, भारतीय समाज पार्टी आणि अपना दल (क) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती.