उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असून रविवारी आग्र्यात समाजवादी पक्षाची सभा पार पडली. मात्र यावेळी मंचावरच अखिलेश यादव यांच्यासमोर असा काही प्रसंग घडला की पक्ष प्रमुखांसोबत उपस्थितांनाही आश्चर्य वाटलं. भाषण सुरु असतानाच माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या रामजीलाल सुमन यांनी रागाच्या भरात आपल्याच पक्षाच्या नेत्यावर हात उगारला. आपलं भाषण सुरु असताना वारंवार अखिलेश यादवांशी चर्चा करत असल्यानेच महासचिव संतपाले आणि अखिलेश यादव यांच्यासमोरच हात उचलण्यासाठी गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झालं असं की, रविवारी अखिलेश यादव आग्र्यात समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे युतीचे उमेदवार मधुसूदन शर्मा यांच्या प्रचारासाठी पोहोचले होते. अखिलेश यादव यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष जितेंद्र वर्मा यांच्यासोबत बसले होते. जितेंद्र वर्मा आणि अखिलेश यादव आपापसात बोलत होते. याचवेळी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव रामजीलाल सुमन सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत मी त्यांना माजी नाही तर भावी मुख्यमंत्री म्हणेन असं सांगितलं. कारण ते १० मार्चनंतर राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.
जितेंद्र वर्मा यांच्यासोबत बोलत असल्याने अखिलेश यादव यांनी कदाचित रामजीलाल सुमन यांचं वक्तव्य ऐकलं नाही. यानंतर रामजीलाल यांनी मागे वळून पाहिलं आणि जितेंद्र वर्मा यांच्याजवळ पोहोचले. त्यांनी जितेंद्र वर्मा यांना कानाखाली मारण्यासाठी हात दाखवला पण तितक्यात अखिलेश यादव यांनी रोखलं.
रामजीलाल यांनी हात उचलल्याचं पाहून काही वेळासाठी जितेंद्र वर्मा यांना आश्चर्य वाटलं. पण अखिलेश यादव आणि तिथे उपस्थित लोकांना मात्र हसू आलं. अखिलेश यादव यांना तर आपलं हसू आवरतच नव्हतं. काही वेळाने जितेंद्र वर्मादेखील हसू लागले.
दरम्यान यावेळी अखिलेश यादव यांनी सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. अखिलेश यादव यांनी यावेळी म्हटलं की, “मुख्यमंत्री गर्मी शांत करण्याबद्दल बोलतात पण आम्ही फक्त राज्यातील तरुणांच्या पोलीस भरतीच्या घोषणेबद्दल बोलत आहोत. करोनाच्या महामारीदरम्यान समाजवादी पक्षाने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं, पण भाजपा सरकारने त्या रुग्णांना इंजेक्शनदेखील उपलब्ध करुन दिलं नाही”.