उत्तर प्रदेश- ५
महेश सरलष्कर, गोरखपूर
‘‘अब्बास विधानसभेत गेल्यावर मुख्तार अन्सारी विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करतील. मग, पिता-पुत्र दोघेही उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिसतील’’, असे खुरहाट गावातील एका शाळा व्यवस्थापकाचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (एसबीएसपी) आघाडी केली आहे. माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचे पुत्र अब्बास हे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर मऊ-शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यावर ते ‘सप’मध्ये गेले. पण, त्यांना ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी मुख्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पुत्र अब्बास यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मऊचा ‘राजकीय वारसा’ अब्बास यांच्याकडे दिला तर मुलगा राजकारणात जम बसवेल, असे मुख्तार अन्सारींना वाटते. ‘’पंचवीस वर्षे काहींनी स्वत:चा विकास करून घेतला, आम्हाला काय मिळाले? अखिलेश-राजभर यांची आघाडी झाली नसती तर अन्सारींचे वर्चस्व संपले असते’’, अशी खंत मऊमधील मध्यमवयीन विणकर इमाम उल्ल हक यांनी व्यक्त केली.
मऊ-शहर विधानसभा मतदारसंघात माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी, भाजपचे अशोक सिंह आणि ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांच्यामध्ये संघर्ष रंगलेला आहे. मऊ शहरात साडेचार लाख मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून लढणाऱ्या मुख्तार अन्सारी यांना ९६ हजार, भाजप आणि ओम प्रकाश राजभर यांच्या ‘एसबीएसपी’ युतीचे उमेदवार महेंद्र राजभर यांना ८८ हजार आणि सपचे उमेदवार अल्ताफ अन्सारी यांना ७२ हजार मते मिळाली होती. अन्सारी यांना ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळाला होता. पण, या वेळी ओम प्रकाश राजभर यांनी भाजपशी काडीमोड घेऊन अखिलेश यादव यांच्याशी युती केली आहे. मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत. त्यामुळे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उभ्या असलेल्या अब्बास अन्सारी यांचा पराभव करणे कठीण असल्याचे सांगितले जाते.
‘’इथे अन्सारीचा पराभव करायचा असेल तर, भाजपची मते ‘बसप’च्या उमेदवाराला मिळायला हवीत. भाजप-बसप यांच्यात ‘समन्वय’ झाला तर ‘सप’ विरुद्ध ‘बसप’ लढाई होऊ शकेल’’, असे खुरहाट गावातील शाळा व्यवस्थापकाचे म्हणणे होते. ‘बसप’च्या भीम राजभर यांच्यामुळे राजभर मते विभाजित होतील. इथे एक लाख दलित मतदार आहेत. अन्सारीविरोधी मुस्लीम मतेही राजभर यांना मिळू शकतात आणि भाजपची वैश्य आणि इतर समाजाची मते मिळतील. हे गणित जमले तर ‘बसप’ला कदाचित ही जागा जिंकता येईल. पण, एकटय़ाच्या जिवावर भाजपला अब्बास अन्सारींचा पराभव करणे अशक्य दिसते, असे या व्यवस्थापकाचे विश्लेषण होते. भाजपचे उमेदवार अशोक सिंह हे भावनिक लढाई लढत आहेत. त्यांचे बंधू अजय प्रकाश सिंह (मन्ना) यांच्या हत्येत मुख्तार अन्सारी यांचा सहभाग असल्याचा आरोप सिंह कुटुंबीयांनी केला आहे. मऊ नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ‘सप’चे स्थानिक नेते अरशद जमाल हे मुख्तार अन्सारींचे विरोधक. शहरातील पहाडपुरा भागात जमाल यांचा अलिशान बंगला आहे. या भागात त्यांचे वर्चस्व असल्याने इथले मुस्लीम विणकर अन्सारींच्या विरोधात बोलण्याचे धाडस दाखवतात. ‘’मऊमध्ये बदल व्हायला पाहिजे, तो कसा होणार? इतकी वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले पण, आमचा काय फायदा झाला?’’, असा युसूफ अहमद या विणकाराचा प्रश्न. करोनाचा इथल्या विणकारांना मोठा आर्थिक फटका बसला. ‘’मोदींनी मोफत धान्य पुरवले पण, आमच्या व्यवसायाचे काय? आम्ही मोदींनी दिलेले धान्य खाऊन बसू का?’’, असा अहमद यांचा दुसरा प्रश्न. ‘सप’ने मोफत वीज वगैरे घोषणा केल्यामुळे मुस्लिम विणकर ‘सप’ आघाडीच्या अब्बास अन्सारी यांना कौल देतील असे मानले जात आहे. मुख्तार अन्सारी यांचे मोठे बंधू सिग्बतुल्लाह अन्सारी हेदेखील गाझीपूरमधून ‘सप’च्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत.