हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरातमध्ये भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला धक्का बसला असून येथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांकडेही सर्वांचेच लक्ष लागले होते. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत होत्या. या मतदारसंघातून त्यांचा मोठ्या फराकाने विजय झाला आहे.
मैनपुरी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव उभ्या असल्यामुळे येथे कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ही जागा जिंकण्यासाठी खुद्द अखिलेश यादव मैदानात उतरले होते. आपल्या पत्नीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मैनपुरी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम आता दिसत आहे. येथे डिंपल यादव मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. डिंपल यादव आणि भाजपाचे उमेदवार रघुराज शाक्य यांच्यात तब्बल २ लाख ८८ हजार १३६ मतांचा फरक आहे. सुरुवातीपासून डिंपल यादव आघाडीवर होत्या.
हेही वाचा >>> गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”
डिंपल यादव यांना ६,१७,६२५ मते मिळाली आहेत. तर रघुराज शाक्य यांना ३,२९,४८९ मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये एकूण २,८८,१३६ मतांचा फरक आहे. डिंपल यादव यांच्या अभूतपूर्व विजयामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. या जागेवरील विजयासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद लावली होती. मात्र येथील मतदारांनी समाजवादी पार्टीच्या पारड्यात मतं टाकली आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाकडून सध्या जल्लोष केला जात आहे.