आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शेणापासून उत्पन्न’ या विधानावरुन गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह दुबईच्या शेखसोबत कोटींची कमाई करणार आणि उत्तर प्रदेशचे तरुण ‘शेण’ विकणार, असं संजय सिंह यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मध्यंतरी उन्नाव येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना भटक्या प्राण्यांच्या मुद्द्यावरुन भाष्य केले होते. आता तुमचे उत्पन्नही जनावरांच्या शेणातूनच होणार आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले होते. याबाबत संजय सिंह यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदीजींची गोबर योजना : मोदी बोलत आहेत, आता तरुण शेण विकून कमावतील, आणि अमित शाहांचा राजकुमार जयशाह दुबईच्या शेखसोबत कोटींची कमाई करेल.”
“देशाच्या पंतप्रधानांच्या नजरेत उत्तर प्रदेशातील तरुणांची काय किंमत आहे हे तुम्ही पाहिले आहे? योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या नजरेत उत्तर प्रदेशच्या तरुणांची किंमत काय? पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सात वर्षांत १४ कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते आणि देशातील बेरोजगारीची समस्या संपली असती,” असे संजय सिंह म्हणाले.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तुम्हाला लाठ्या दिल्या, गुन्हे दाखल झाले. सुहागन शिक्षामित्र महिलांनी मुंडण करून या सरकारविरोधात निदर्शने केली. प्रयागराजमध्ये तरूणांना घराबाहेर काढून मारहाण करण्यात आली,” असेही आप नेत्याने म्हटले.
“जेव्हा बेरोजगारीमुळे तरुणांनी आत्महत्या केली, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, आधी आम्ही तुम्हाला पकोडे विकण्याचा सल्ला दिला होता आणि आता गोबर योजना आणली आहे. उत्तर प्रदेशचे तरुण पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला शेण विकण्याच्या लायकीचे समजतात. यापेक्षा तुमचा अपमान होऊ शकत नाही,” असे संजय सिंह म्हणाले.